सुशांत राजपूत यांची आत्महत्या नसून हत्या - नारायण राणे यांचा दावा

August 05,2020

मुंबई : ५ ऑगस्ट -  अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या नव्हे तर त्याची हत्या झाली आहे, असा दावा राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांनी केलं आहे. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्र सरकार कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप देखील त्यांनी केला आहे. मुंबई येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सुशांतची आत्महत्या नसून ही हत्याच आहे. पोलीस योग्य दिशेनं तपास करत नाही. याप्रकरणी पाटणामध्ये एफआयआर दाखल झाली. मात्र मुंबई पोलिसांनी अजून एफआयआर दाखल केली नाही. गेल्या 50 दिवसांत मुंबई पोलिसांनी आरोपींचा शोध का लावला नाही,’ असा सवाल देखील नारायण राणेंनी उपस्थित केला. या प्रकरणाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत असल्याचीही टीका त्यांनी केली.

सुशांचती मॅनेजर दिशा सालियनने आत्महत्या केली नसून तिचीसुद्धा हत्या करण्यात आली आहे. तसेच दिशा सालियन आत्महत्या प्रकरणाचा तपास का झाला नाही, असा प्रश्न नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात दरदिवशी नवीन ट्विस्ट येत आहेत, नवीन खुलासे समोर येत आहेत. त्यातच मुंबई आणि बिहार पोलिसांच्या तपासावरुनही मतभेद निर्माण झाले आहेत. या प्रकरणात सातत्याने सीबीआय तपासाचीही मागणी होत आहे