रस्त्यावर ओतण्यासाठी अमरावतीत आंदोलकांकडे दुधच नव्हते

August 01,2020

अमरावती : १ऑगस्ट - गाईच्या दुधाला 10 रुपये प्रति लिटर अनुदान, दुधाच्या भूकटीला 50 रुपये अनुदान,तसेच दुध खरेदी करायचे असल्यास 30 रुपये प्रति लिटरने दूध खरेदी करावे या मागणीसाठी भाजप सह आदी संघटना कडून राज्यभर विविध ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. परंतु माजी कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडें यांच्या नेतृत्वाखाली अमरावतीच्या नांदगाव पेठ टोल नाक्यावर करण्यात आलेल्या दूध आंदोलनासाठी दूध न मिळाल्याने आंदोलकांची चांगलीच फजिती झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

भाजपचे आंदोलक आज पहाटे 4 वाजल्यापासून दोन तास दूध टँकरची वाट पाहत होते. वाट पाहूनही दुधाने भरलेला टँकर न आल्याने हतबल झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी अखेर दूध आणण्यासाठी जात असलेल्या एका वाहनाला थांबवून त्यातील दुधाचे रिकामे कॅन बाहेर काढून घेतले आणि सोबत आणलेल्या दुधाच्या पिशव्या त्यावर ठेऊन भाजपने आंदोलन केल्याचे समोर आले आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यात दूध दरवाढीची मागणी जोर धरू लागली आहे.राज्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काही दिवसांपूर्वी राज्यात दूध दरवाढी साठी आंदोलन केले होते.भाजपनेही नागपंचमीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दूध पाठवले होते.त्यांनतरही दूध प्रश्नी तोडगा न निघाल्याने आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करून व लोकमान्य टिळक यांचे स्मरण करुन भाजपकडून राज्यभर दूध दरवाढीसाठी आंदोलन करण्यात येत आहे.

दरम्यान, राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना उध्वस्त करण्याचे काम उध्दव ठाकरे सरकार करत आहे.दुधाचा उत्पादन खर्च हा पंचवीस रुपये असताना मात्र दुधाला दहा ते पंधरा रुपये भाव मिळतोय, असे माजी कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडें म्हणाले. गाईच्या दुधाला दहा रुपये प्रति लिटर अनुदान,पन्नास रुपये दुधाच्या भूकटीला अनुदान,तसेच दुध खरेदी करायचे असल्यास तीस रुपये प्रति लिटरने दूध खरेदी करावे, अशी मागणी त्यांनी केली.

20 जुलै रोजी दूध दरवाढीसाठी नागपंचमीला मुख्यमंत्री व बाकी मंत्र्यांना दूध पाठवले. परंतु, या सरपटणाऱ्या सरकारला अजूनही जाग येत नाही. तात्काळ दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या मंजूर केल्या नाही तर मंत्र्यांच्या घरी जाणारे दूध बंद करु, असा इशारा अनिल बोंडे यांनी राज्य सरकारला दिला आहे. या आंदोलनात भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.