सरसकट सर्वानाच कोरोना लस द्यावी - राहुल गांधींची मागणी

April 07,2021

नवी दिल्ली : ७ एप्रिल - देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असताना कोरोनाच्या लसीकरणावरुन राजकारण सुरू झाल्याचं दिसून येतंय. कोरोना लसीकरणासाठी केंद्र सरकारने वयाची ठराविक अट लादली असताना सरसकट सर्वांनाच कोरोनाची लस देण्यात यावी अशी मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. वयाची अट घालणे म्हणजे निरर्थक वाद आहे असंही ते म्हणाले. 

 राहुल गांधी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "गरजांवर वादविवाद करणे मुर्खपणा आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित जीवन जगण्याचा हक्क आहे."

देशातील कोरोनाच्या लसीकरणाचा कार्यक्रम पद्धतशीरपणे राबवण्यात येत असून टप्प्या-टप्प्याने सर्वांचे लसीकरण करण्यात येणार आहे असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे. 

देशातील डॉक्टरांची अग्रणी असलेली संस्था इंडियन मेडिकल असोसिएशन  यांनी लसीकरणासाठी देशभरात वयाची अट 18 इतकी करावी अशा मागणीचे पत्र पंतप्रधानांना लिहिले आहे.

देशात आणि विशेष करून महाराष्ट्र राज्यात कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी अनेक कठोर निर्बंध घालण्यात आले आहेत. या कोरोनाच्या संसर्गाचा फैलाव थांबावा याकरिता कोरोनाविरोधातील लस राज्यातील सर्व तरुणांना मिळावी म्हणून लसीकरणासाठी असणारी वयाची अट शिथिल करून 25 करावी अशी  मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही लसीकरसाठी वयाची अट असून नये असं सूचित केलंय. यामुळे आता देशात आणि राज्यात वयाची अट न ठेवता सरसकट लसीकरणाची मागणी जोर धरू लागली आहे. सध्या 45 वर्षावरील व्यक्तींना लसीकरणाची मुभा देण्यात आली आहे.