मनपाला ‘स्टार म्यूनिसिपल लिडरशीप’ पुरस्कार प्रदान

January 13,2021

नागपूर : १३ जानेवारी - पौर्णिमा दिनानिमित्त नागपूरकरांना ऊर्जा बचतीचा संदेश देणा-या नागपूर महानगरपालिकेचा ‘अर्थ डे नेटवर्क इंडिया’ कडून सन्मान करण्यात आला आहे. अर्थ डे नेटवर्क इंडिया’ कडून ‘ऊर्जा बचत’ गटातील यंदाचा ‘स्टार म्यूनिसिपल लिडरशीप’ पुरस्कार नागपूर महानगरपालिकेला प्रदान करण्यात आला आहे. नागपूर महानगरपालिकेने पौर्णिमा दिनी ग्रीन व्हिजील फाउंडेशनच्या सहकार्याने सुरू केलेल्या उपक्रमाची ‘अर्थ डे नेटवर्क इंडिया’ने दखल  घेतल्याने मनपाचा देशात नाव लौकीक झाला आहे. मनपाच्या या यशाबद्दल महापौर दयाशंकर तिवारी व आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्य करणा-या सर्व स्वयंसेवकांचे व म.न.पा. कर्मचा-यांचे अभिनंदन केले.

नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या वतीने २०१४ पासून ऊर्जा बचतीच्या दृष्टीने पौर्णिमा दिवस हा विधायक उपक्रम तत्कालीन महापौर  व आमदार प्रा. अनिल सोले यांच्या मार्गदर्शनात हाती घेण्यात आला होता. या उपक्रमांतर्गत प्रत्येक पौर्णिमेच्या प्रकाशात रात्री अनावश्यक वीज दिवे बंद करण्याचे आवाहन करण्यात येते. त्याला प्रतिसाद देत नागरिकही या विधायक उपक्रमात सहभागी होतात. पौर्णिमेच्या रात्री  ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे स्वयंसेवक शहरातील विविध भागात फिरून नागरिकांना,  व्यापाऱ्यांना अनावश्यक वीज दिवे रात्री ८ ते ९ या वेळात बंद करण्याचे आवाहन करतात. मनपा आणि ग्रीन व्हिजीलच्या या आवाहनाला शहरातील नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत २ लाख ५३ हजार २०१ किलो कार्बन उत्सर्जनावर नियंत्रण आणण्यात आले आहे. विशेष म्हणजे, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ‘मन की बात’मधून मनपाच्या पोर्णिमा दिन उपक्रमाचे कौतुक केले आहे.

‘अर्थ डे नेटवर्क इंडिया’ द्वारे देशातील महानगरपालिकांसाठी १० वेगवेगळ्या श्रेणीतील ‘स्टार म्युनिसिपल लिडरशीप’ पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती. विशेष म्हणजे, या पुरस्कारासाठी मनपाला स्वत: अर्ज न करता त्यासाठी शहरातील नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था किंवा शैक्षणिक संस्थाद्वारे नामांकन सादर करणे अनिवार्य होते. त्याअंतर्गत तत्कालीन आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनात ग्रीन व्हिजील फाउंडेशनचे संचालक कौस्तभ चॅटजी व सुरभी जायस्वाल यांनी ऊर्जा बचत आणि हरीत आच्छादनाचा वाढता वापर या दोन श्रेणींमध्ये नागपूर महानगरपालिकेचा नामांकन प्रस्ताव दाखल केला होता. ग्रीन व्हिजील फाउंडेशनने प्रभावीपणे आंतरराष्ट्रीय स्तरावर नागपूर महानगरपालिकेची बाजू मांडली. मनपाद्वारे सुरू असलेल्या उपक्रमाची माहिती सुद्धा सादर केली. या सादरीकरणाच्या आधारे मनपाची ‘ऊर्जा बचत’ या श्रेणीतून निवड करीत ‘स्टार म्यूनिसिपल लिडरशीप’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पुरस्काराबद्दल ‘अर्थ डे नेटवर्क इंडिया’च्या भारतीय संचालक करुणा सिंग यांनी मनपाचे अभिनंदन केले व पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासासंबंधी उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या.

नागपूर महानगरपालिकेसह वेगवेगळ्या श्रेणींमध्ये देशातील पुरी,  महाबळेश्वर, अहमदाबाद,  थिरूअनंतपुरम, कोलकाता, करीमनगर, अमृतसर, दक्षिण दिल्ली आणि विशाखापट्टनम या महानगरपालिकांनाही ‘अर्थ डे नेटवर्क इंडिया’ तर्फे ‘स्टार म्युनिसिपल लिडरशीप’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

पर्यावरणपूरकतेच्या दृष्टीने उपयुक्त उपक्रम : आयुक्त राधाकृष्णन बी.

देशातील हिरवे शहर अशी ओळख असलेले आपल्या नागपूर शहराने पर्यावरणपूरकतेच्या दृष्टीने एक उपयुक्त असा उपक्रम सुरू केला आहे. हिरवे शहर यासोबतच ऊर्जा बचत करणारे शहर म्हणूनही नागपूरने स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. या यशामागे ग्रीन व्हिजील फाउंडेशनच्या स्वयंसेवकांद्वारे करण्यात येणारी जनजागृतीची सुद्धा मोठी भूमिका आहे. नागपूरकरांमध्ये पोर्णिमा दिनानिमित्त मागील सहा वर्षापासून जनजागृती करणा-या ग्रीन व्हिजील फाउंडेशनचे संचालक कौस्तभ चॅटर्जी यांच्यासह त्यांच्या चमूचे मनपातर्फे अभिनंदन.