नुकसानीने त्रस्त शेतकऱ्याने पेटवले ५ एकरातील सोयाबीनचे पीक

October 28,2020

यवतमाळ : २८ ऑक्टोबर - शेतकऱ्यांना यावर्षी बोगस बियाणांमुळे सोयाबीनची दुबार पेरणी करावी लागली. यानंतर सोयाबीनवर खोडकीड आल्यामुळे शेतकरी संकटात सापडला. यातही कशीबशी वाट शोधत शेतकऱ्यांनी सोयाबीनची सोंगणी केली. मात्र, परतीच्या पावसाने या सोयाबीनचे पूर्णता नुकसान झाले. शासनाकडे वारंवार लेखी निवेदन दिले. शासनाने याची कुठलीच दखल न घेतल्याने नुकसानीचे अद्यापही पंचनामे करण्यात आले नाही. त्यामुळे लागवड खर्चही निघत असल्याने महागाव तालुक्यातील मनीष जाधव या शेतकऱ्याने आपल्या पाच एकर सोयाबीन अक्षरश: पेटवून दिले.

यावर्षी जिल्ह्यातील शेतकरी आस्मानी आणि सुलतानी संकटांनी त्रस्त आहे. सुरुवातीला शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागले. कशी-बशी पैशांची तजवीज करून शेतकऱ्यांनी दुबार पेरणीही केली. जिल्ह्यात दमदार पावसाने शेतकऱ्यांच्या शेतात पिके दिमाखात उभी होती. शेतकऱ्यांच्या पदरी दोन पैसे पडतील, अशी आशाही निर्माण झाली होती. पण, परतीच्या पावसाने पिकांचे मातेरे केले. शेतकऱ्यांच्या उरल्या-सुरल्या आशाही नष्ट झाल्या आहेत. 

पावसाने उसंत घेतल्याने सोयाबीन सोंगणीस सुरुवात केली. सोयाबीनच्या झालेल्या नुकसानीची कल्पना अधिकाऱ्यांना दिली असता सरकारी निकषात आपला तालुका बसत नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. संतप्त झालेल्या मनीष जाधव यांनी सरकारचा निषेध व्यक्त करीत आपल्या पाच एकरमधील शेतातील सोयाबीन पेटवून दिले. आई जेऊ घालीना आणि बाप भीक मागू देईना, अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. जिल्ह्यात शेतकऱ्यांचे परतीच्या पावसाने कंबरडे मोडले आहे. सरकारी निकष बदलून शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.