सर्जिकल स्ट्राइकला आज ४ वर्ष पूर्ण

September 28,2020

नवी दिल्ली : २८ सप्टेंबर - भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राइकला आज चारवर्ष पूर्ण झाली. सप्टेंबर २०१६ मध्ये जम्मू-काश्मीरमधील उरी येथील लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून हा सर्जिकल स्ट्राइक करण्यात आला. दर महिन्यात एका रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधतात. कालच्या रविवारी त्यांनी जनतेला या सर्जिकल स्ट्राइकची आठवण करुन दिली.

“चार वर्षांपूर्वी याचवेळी सर्जिकल स्ट्राइक करण्यात आला. त्यावेळी जगाने आपल्या सैनिकांची हिम्मत आणि शौर्य पाहिले. काहीही करुन, भारतमातेचे वैभव आणि सन्मान याचे रक्षण करणे, हेच आपल्या सैनिकांसमोर उद्दिष्टय होते. त्यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा केली नाही. त्यांनी त्यांचे कर्तव्य बजावले. ते विजयी होऊन कसे परतले, ते सुद्धा आपण पाहिले” असे पंतप्रधान मोदी ‘मन की बात’ मध्ये म्हणाले.

भारतीय लष्कराच्या स्पेशल फोर्सेसनी हे ऑपरेशन केले होते. २७-२८ सप्टेंबरच्या रात्री भारतीय कमांडोज एलओसी पार करुन पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसले व त्यांनी दहशतवाद्यांचे लाँचपॅड्स उद्धवस्त केले. उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील उरी येथील लष्कराच्या तळावर पाकपृरस्कृत दहशतवाद्यांनी १८ सप्टेंबरला आत्मघातकी हल्ला केला होता. त्याला हे प्रत्युत्तर होते. या हल्ल्यात भारताचे १९ जवान शहीद झाले होते.

२४ सप्टेंबरला लष्कराने स्ट्राइकची तयारी सुरु केली. स्पेशल फोर्सेसकडे या मिशनची जबाबदारी सोपवण्यात आली. हे सर्व कमांडोज नाइट व्हीजन उपकरणे, तावोर २१, एके-४७ रायफल्स, ग्रेनेड आणि खाद्यांवरुन डागता येणाऱ्या मिसाइल्सनी सुसज्ज होते. प्रत्येत टीमकडे एक टार्गेट सोपवण्यात आले होते. भारतीय सैनिक पीओकेमध्ये घुसण्याआधी २७ सप्टेंबरच्या रात्री दहाच्या सुमारास जम्मू-काश्मीर आणि पंजाब सीमेवरील गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात झाली होती.

भारतीय कमांडोजनी जे लाँचपॅड्स उद्धवस्त केले, त्या ठिकाणी हे दहशतवादी थांबायचे. लाँचपॅड्सवर कमांडोजनी हल्ला करण्यााधी तिथे पहारा देणाऱ्या दहशतवाद्यांचा स्नायपर्सनी खात्मा केला. जवळपास पाच तास हे संपूर्ण ऑपरेशन चालले. सहा लाँचपॅड्स उद्धवस्त करताना एकाचवेळी ४५ दहशतवाद्यांचा खात्मा केला असे लष्कराकडून सांगण्यात आले. फायलन ऑपरेशनच्या एका आठवडाआधीपासून या लाँचपॅडसच्या सर्व हालचालींवर भारतीय सैन्याचे लक्ष होते.