नागपूरच्या जनता कर्फ्यूला अत्यल्प प्रतिसाद

September 27,2020

नागपूर : २७ सप्टेंबर - कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वच स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. नागपूरातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर महानगरपालिकेकडून शनिवार व रविवार रोजी महापौर संदीप जोशी यांनी ऐच्छिक जनता कर्फ्यूची हाक दिली होती. मात्र, दुसऱ्या आठवड्यातही जनता कर्फ्यूला अत्यल्प  प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.या  शिवाय  रस्त्यावर नागरिकांची वर्दळ नेहमीप्रमाणेच होती. त्यामुळे नागपूरकरांनी जनता संचारबंदी नाकारल्याचे चित्र दिसत होते. 

गेल्या  आठवड्यातील शनिवार व रविवार या दिवशी जनता कर्फ्युला नागपूरकरांनी समिश्र प्रतिसाद दिल्याचे पहायला मिळाले होते. मात्र, आज सर्व बाजारपेठा खुल्या होत्या. शहरातील अनेक चौकांमधे गर्दी पहायाला मिळत आहे. शिवाय रस्त्यावर वाहनांची वर्दळही कायम असल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे बाजारपेठांकडूनही जनता कर्फ्यूला अत्यल्प  प्रतिसाद आहे.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दिलेल्या ऐच्छिक जनता कर्फ्यूच्या हाकेला नागपूरकरांनी केराची टोपली दाखवली आहे. शिवाय अनेक नागरिक रस्त्यावर दिसून येत आहे. त्यामुळे जनता कर्फ्यू कोणासाठी ? हा सवालही उपस्थित होत आहे.  त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी केलेल्या जनता कर्फ्यूला दुसऱ्या आठवड्यात अत्यंत अल्प प्रतिसाद मिळत आहे. अशावेळी नागपूरकर बेजबाबदारपणे वागत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.