अभ्यास करून मागणीनुसार पिकाचे उत्पादन घ्या नितीन गडकरी

May 25,2020

नागपूर, 25 मे - जागतिक स्तरावर कोणत्या उत्पादनाला मागणी आहे, याचा अभ्यास करून शेतकर्‍यांनी ते पीक घ्यावे. परंपरागत पिकांपासून आता बाजूला होण्याची वेळ आली आहे. तेलबियांचे उत्पादन अधिक वाढविण्याची गरज आहे,  असे मत केेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. तसेच शेतकर्‍यांचा संपूर्ण कापूस यंदा 10 ते 15 जूनपर्यंत खरेदी झाला पाहिजे यासाठी आपले प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले.

काल दुपारी गडकरी यांनी अ‍ॅग्रो व्हिजनच्या माध्यमातून शेतकर्‍यांशी ई-संवाद साधला. राज्याचे पशुपालन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार, माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खा. कृपाल, तुमाने, आ. समीर मेघे, अ‍ॅग्रो व्हिजनचे अध्यक्ष रवी बोरटकर, कोषाध्यक्ष रमेश मानकर, आ. टेकचंद सावरकर, सुधीर दिवे, आनंदराव ररूत, डॉ. सी.डी. मायी, प्रशांत वासाडे हे या संवाद कार्यक्रमात सहभागी झाले होते. शेतकर्‍यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून पुढे गेले पाहिजे. गहू,  तांदूळ, साखर यांचा साठा देशात मुबलक आहे. यापेक्षा अधिक उत्पादन झाले तर सरकार गहू तांदळाला भाव देऊ शकणार नाही. अशावेळी आपण जागतिक बाजारपेठेत कशाची मागणी अधिक आहे. याचा अभ्यास करून त्या वस्तूचे  उत्पादन घेतले पाहिजे. कापसाच्या खरेदीत अनेक समस्या आहेत. आपण आज 90 हजार कोटींचे खाद्य तेल आयात करीत असतो. सोयाबीन आपण पेरतो. पण अन्य देशांच्या तुलनेत आपल्याकडे सोयाबीनचे एकरी उत्पादन अल्प आहे. हे  उत्पादन कसे वाढणार याचा अभ्यास शेतकर्‍यांनी केला पाहिजे. रब्बीमध्ये सूर्यफुलाची लागवड करणे महत्त्वाचे ठरणार आहे. धानाला सूर्यफूल हा पर्याय निर्माण होऊ शकतो, शेतकर्‍यांनी आधी आपल्या जमिनीची तपासणी केली पाहिजे.  गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा,गोंदिया या भागात मध उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे. मधमाशी पालन प्रकल्प वाढले तर मध उत्पादन वाढणार आहे. तसेच पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मालगुजारी तलाव आहेत. या तलावात मत्स्यपालन योजना  तयार झाली पाहिजे. ताडीमाडी प्रकल्पासाठी 500 कोटी केेंद्राने मंजूर केले आहे. यातून 40 हजार लोकांना रोजगार मिळेल, असेही गडकरी यांनी स्पष्ट केले.