मूल्याधिष्ठित जीवनपध्दती ही आम्हाला भारतीय संस्कृतीकडून मिळालेली देण : गडकरी

July 13,2020

नागपूर : १३ जुलै - विश्वकल्याण ही आमची संकल्पना आहे. सर्व विश्वाचे कल्याण होवो ही आमची भावना आहे. हीच हिंदू संस्कृतीची विशेषत: असून, समाजातून जातीयता, अस्पृश्यतेचे निर्मूलन करून सामाजिक समानता आम्हाला निर्माण करायची आहे. त्यासाठी मूल्याधिष्ठित जीवनपध्दती ही आम्हाला भारतीय संस्कृतीकडून मिळालेली देण आहे, त्या आधारे मूल्याधिष्ठित समाजपध्दती आम्ही विकसित करीत आहोत, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी केले.

संकल्प फाऊंडेशनच्या गुरू सन्मान कार्यक्रमात गडकरी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उपस्थितांना संबोधित करीत होते. यावेळी डी.पी. सिंग, राजकुमार भाटिया, दीपककुमार भट्टाचार्य, शांतीकुमार जैन, राधेशाम गुप्ता, संतोषकुमार तनेजा ऑनलाईन उपस्थित होते. 

पुढे गडकरी म्हणाले की, संघटनेला संघटित करून, व्यक्तींवर संस्कार करून व्यक्तिनिर्माणाचे कार्य आम्ही करीत आहोत. पण ही प्रक्रिया गतिशील कशी बनेल, समाजाच्या सर्व क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन करून हा समाज, देश आत्र्मनिभर बनवायचा आहे. राष्ट्र आमची मातृभूमी, राष्ट्रवाद आमचा आत्मा, त्याचा सर्वांगीण विकास आणि उन्नती व विकास करताना सर्वच क्षेत्रात पर्वितन घडवून आपल्या विचारधारेचा उपयोग करून जगाला दिशा देणारे नेतृत्व आमच्या देशाने करावे हा आमचा उद्देश आहे, असेही ते म्हणाले. 

मूल्याधिष्ठित जीवनपध्दती, शिक्षणपध्दती आणि समाजपध्दती विकसित करीत असताना आमच्या शिक्षणाने, शिक्षणाच्या संस्काराने ज्या प्रकारचा व्यक्तिविकास आम्हाला करायचा होता. तो उद्देश आमचा यशस्वी झाला की नाही हा चर्चेचा विषय होऊ शकतो, असे सांगून गडकरी म्हणाले, शिक्षणाचा संबंध रोजगाराशी व अर्थव्यवस्थेचा संबंध ज्ञानाशी आहे. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, कौशल्य, संशोधन व यशस्वी प्रयोग ही अर्थव्यवस्थेची परिभाषा आहे. ज्ञान विज्ञान, तंत्रज्ञानाचा उपयोग करून पुढील पिढीला स्वावलंबी बनवायचे आहे. त्यांच्या कौशल्य गुणांचा विकास करायचा आहे. ज्ञान हे शिक्षणातून मिळते. हे ज्ञान सामान्य माणसापर्यंत पोहोचावे व त्यातून जीवनात पर्वितन घडवून आणणे आमचा उद्देश आहे, असेही गडकरी म्हणाले.