वाशिममध्ये केंद्रसरकार विरोधात बैलबंडी मोर्चा

July 09,2020

वाशीम : ९ जुलै - केंद्र सरकारने वाढविलेल्या पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किंमती तसेच दुबार पेरणी, खरडून गेलेल्या जमिनी, बोगस बियाणे, डिझीटल शिक्षण प्रणालीसाठी इंटरनेट सुविधा मोफत करण्यासंदर्भात वाशीम जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी आज, जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलबंडी मोर्चा काढला.

त्यानंतर जिल्हाधिकारी ऋषीकेश मोडक यांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले की, भाजप सरकार सत्तेवर येताच डिझेल, पेट्रोल व गॅस चे दर गगनाला भिडले आहे. गॅस दरवाढीमुळे सर्वसामान्याचे जीवन असह्य झाले आहे. सोबतच जिल्ह्यात शेतकर्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले असून, काही ठिकाणी जमिनी खरडून गेल्या आहेत. या बोगस बियाण्यााची समस्या सर्वदूर आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदील झाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने बैलगाडी आंदोलन केंद्र सरकार विषयी रोष व्यक्त करण्यात येत असल्याचेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

 यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस च्या महिला जिल्हाध्यक्षा शुभदा नायक, रायुकाँचे जिल्हाध्यक्ष प्रमोद चौधरी, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष विनोद पट्टेबहादूर, गजानन आरु, गणेश मते, सुभाष बोरकर, विठ्ठलराव काळबांडे, पवन राऊत, ज्योती ठाकरे आदीसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.