शिवसेनेचा खंडणीबाज माजी शहरप्रमुख अटकेत

July 09,2020

नागपूर :९जुलै - फसवणुकीच्या प्रकरणात फरार असलेला शिवसेनेचा माजी शहर प्रमुख मंगेश श्यामराव कडव (वय ४५) याला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. मंगेश हा त्यांच्या मित्राच्या घरी जात होता. ऑटोमधून कपड्याने चेहरा लपवत तो फिरत होता. पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. पांढराबोडी येथील मित्राकडे तो जात होता. पोलिसांनी संपूर्ण परिसर घेरत ऑटोतून बाहेर पडताच त्याच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, दुपारी मंगेशच्या अटकेतील पत्नीला न्यायालयापुढे सादर करण्यात आल्यानंतर तुरुंगात पाठविण्यात आले. 

डोंगरे ले-आऊट अभ्यंकरनगर निवासी मंगेश कडव त्याची पत्नी तसेच त्यांच्या साथीदारांवर मागील काही दिवसांमध्ये हुडकेश्वर, सक्करदरा, अंबाझरी तसेच बर्डी पोलिस ठाण्यात फसणुकीचे प्रकरण दाखल करण्यात आले आहे. ही प्रकरणे संपत्ती खरेदी-विक्री, वसुली तसेच नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत लाखो रुपये लंपास करण्याचे आहेत. या सर्व प्रकरणाचा तपास हा गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. प्रकरण दाखल झाल्याची माहिती मिळताच मंगेश आणि त्याचे साथीदार हे फरार झाले. त्यांच्या शोधात गुन्हे शाखेची चार टिम कामावर होती. दरम्यान, बुधवारी (ता.८ जुलै) रोजी, गुन्हे शाखेला मंगेशच्या फोनचे लोकेशन सापडले. शिवाय, मंगेश हा पांढराबोडी येथील त्याच्या मित्राच्या घरी जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्या आधारावर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. त्यानंतर त्याला गुन्हे शाखेत आणण्यात आले. माजी नगरसेवक निमिशा शिर्के यांचे पती देवा शिर्के यांच्या तक्रारीनंतर मंगेश विरुद्ध सक्करदरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मंगेशने केलेल्या फसवणुकीनंतर देवा यांनी आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता. या प्रकरणात मंगेशला अटक करण्यात आली आहे.