चंद्रपुरात वाढली डेंग्यूची साथ

August 05,2020

चंद्रपूर : ५ ऑगस्ट - कोरोना या महाभयंकर महामारीसह डेंग्यूसारखे आजार नागरिकांचे बळी घेत असल्याने नागरिकांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. बाबूपेठमधील नॉर्मल स्कूल वॉर्डात डेंग्यूची साथ पसरली असून दोन जणांचा डेंग्यूूने मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत असल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. 

डेंग्यूचे प्रमाण वाढत असताना आरोग्य विभागाला अद्यापही जाग आलेली नाही. तर मनपा झोन सभापतींचा वॉर्ड असूनही मनपाची फवारणी, साफसफाई सारखे प्रतिबंधात्मक उपाय केले जात नसल्याने परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती बळावली आहे. बाबूपेठ भागातील नॉर्मल स्कूल वॉर्डातील बालाजी मंदिर वॉर्ड, समता चौक या भागात गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना डेंग्यूच्या आजाराने ग्रासले आहे. डेंग्यू हा आजार गंभीर स्वरूपातील असल्याने यात नागरिकांचा जीव जाण्याचा धोका आहे. याची दखल घेत मनपाने सदर परिसरात रोगप्रतिकार फवारणी, साफसफाई करीत प्रतिबंधात्मक उपायाला प्राधान्य द्यावे. डेंग्यूने वॉर्डातील ४१ वर्षीय इसमाचा तसेच २२ वर्षीय तरुणाचा बळी घेतला आहे. अनेक नागरिक गंभीर अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहेत. परिसरातील नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. मनपासह आरोग्य विभागाने बाबूपेठ वॉर्डात प्रतिबंधात्मक उपाय योजना कराव्यात अशी नागरिकांची मागणी आहे.