गुणवत्तापूर्ण शिक्षणाची आता देशाला गरज - डॉ. एस. सी. शर्मा

August 05,2020

नागपूर : ५ ऑगस्ट - विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणार्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची आता देशाला गरज आहे. त्यासाठी गुणवत्तापूर्ण विद्यार्थी आणि शिक्षक आणि पयार्याने आदर्श समाज घडविण्याचे मोठे आव्हान  विद्यापीठांसमोर असल्याचे मत राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषदेचे (नॅक) संचालक डॉ. एस. सी. शर्मा यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा ९७ वा वर्धापनदिन ऑनलाईन सोहळा साजरा झाला. यावेळी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. 

वर्धापनदिन सोहळ्यात चित्रकार चंद्रकांत चन्ने यांना 'राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवनसाधना पुरस्कार' जाहीर करण्यात आला. कार्यक्रम ऑनलाईन असल्याने यावेळी पुरस्कार फक्त जाहीर करण्यात आला. कोरोनाचे सावट दूर होताच त्यांना हा पुरस्कार ससन्मान प्रदान करण्यात येणार आहे. कार्यक्रमात प्रभारी कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, कुलसचिव डॉ. नीरज खटी व्यासपीठावर उपस्थित होते. विद्यापीठांनी सर्वांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात जोडावे, असे आवाहन डॉ. शर्मा यांनी यावेळी केले. 

यावेळी त्यांनी राष्ट्रंसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांवर विद्यापीठाने वाटचाल करावी, असेही म्हणाले. विद्यापीठाच्या आजवरच्या वाटचालीमध्ये सर्व अधिकारी व कर्मचार्यांचा मोठा वाटा असून, विद्यापीठाने उत्तम दजार्चे संशोधन करून त्यात सहभागी होण्याचा संकल्प या वर्धापनदिनी करावा, असे आवाहन कुलगुरू डॉ. चांदेकर यांनी केले. डॉ. सुभाष चौधरी यांनी प्रास्ताविकातून विद्यापीठाच्या प्रगतीचा अहवाल उपस्थितांसमोर मांडला. 

राष्ट्रसंताच्या बहुमुखी व्यक्तित्वाचा आणि विचारांचा 'राष्ट्रसंत तुकडोजी महाराज : साहित्यसुगंध' या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. तर कुलसचिव डॉ. खटी यांनी आभार व्यक्त केले. डॉ. कोमल ठाकरे यांनी सूत्रसंचालन केले. समारंभात विद्यापीठाने आदर्श पुरस्कार तसेच अन्य विशेष पुरस्कारही जाहीर करण्यात आले.