टाटा सुमोतील अवैध दारूसाठा पोलिसांनी केला जप्त

August 05,2020

चंद्रपूर : ५ ऑगस्ट  - टाटा सुमो वाहनातून वाहतूक करण्यात येत असलेला दारूसाठा पोलिसांनी जप्त केला. मुद्देमालासह 6 लाख 50 हजार रुपयांची दारू पोलिसांनी जप्त केली. ही कारवाई राजुरा तालुक्यातील पेलोरा फाटा येथे डीबी पथकाने आज (बुधवार) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास केली.

टाटा सुमो वाहनातून मोठ्या प्रमाणात दारूसाठा येत असल्याची माहिती खबऱ्याकडून पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी सापळा रचला. पेलोरा फाटा येथे नाकाबंदी केली. नाकाबंदी दरम्यान आलेल्या टाटा सुमो वाहनांची पोलिसांनी झडती घेतली असता, 1 लाख 50 हजारांचा दारूसाठा आढळून आला. दीड लाखांचा दारूसाठा, पाच लाखांचे वाहन, असा एकूण 6 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. 

याप्रकरणी शेख रहेमान शेख जब्बार (रा.वणी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई उप-विभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक नरेंद्र कोसूरकर, डीबी पथकातील पोलीस हवालदार रविंद्र नक्कनवार, हेमंत बावणे यांनी केली.