अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

August 05,2020

नाशिक : ५ ऑगस्ट - इगतपुरी तालुक्यात काल मध्यरात्रीच्या सुमारास कर्होळे-रायांबे मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एक बिबट्या ठार झाला. ही घटना काल रात्रीच्या सुमारास घडल्याचे समजले आहे. आज सकाळी ही बाब निदर्शनास आली.

काल मध्यरात्रीच्या सुमारास बिबट शिकारीच्या शोधात कर्होळे-रायांबे मार्गावर संचार करत होता. दरम्यान, मार्गावरून धावणाऱ्या एक अज्ञात वाहनाने बिबट्याला धडक दिली. यात बिबट्याच्या डोक्याला व छातीला गंभीर मार लागल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला. वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार बिबट नर जातीचा असून अंदाजे एक ते दीड वर्षाचा आहे. दरम्यान, आज वैतरणा शिवारात मृत बिबट्यावर शवविच्छेदन करण्यात येऊन अंत्यसंस्कार करण्यात आले.

जिल्ह्यात गेल्या 8 दिवसात 4 बिबट्यांना जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. मात्र अजूनही नाशिकच्या दारणा, गोदावरी नदी काठच्या परिसरात अनेक बिबट असून ते शिकारीसाठी मानवीवस्तीकडे येत असता. तसेच बिबट्याचा मनुष्यावर हल्ल्याच्या घटना वाढल्या असून त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नाशिकरोड, सिन्नर निफाड या भागात वन विभागाकडून पिंजरे लावण्यात आले आहेत.