माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर पाटील यांचे निधन

August 05,2020

पुणे : ५ ऑगस्ट - माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर (वय ९१) यांचं आज पहाटे २.१५ वाजता निधन झाले.   शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना दोन दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांनी या वयातही कोरोनावर मातदेखील केली पण बुधवारी सकाळी किडनीच्या विकाराने त्यांचं निधन झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निलंगेकर यांची अचानक प्रकृती खालावल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. गेल्या महिन्यात त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि त्यांनतर पुढील उपचारासाठी त्यांना पुण्यात हलवण्यात आलं. पण तिथे किडनी विकाराच्या आजाराने त्यांचं निधन झालं.

निलंगेकर यांचा राजकीय इतिहास खूप मोठा आहे. 1985 ते 86 दरम्यान ते राज्याचे मुख्यमंत्री होते. लातूरचा एक शक्तिशाली सहकारी नेता अशी त्यांची ओळख आहे. त्यांचे नातू संभाजी पाटील हे भाजपचे आमदार आहेत. संभाजी हे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये राज्याचे कामगार मंत्री होते.

निलंगा गावाहूनच त्यांनी आपली राज्यच नव्हे देशभर निलंगेकर म्हणून ओळख निर्माण केली होती. अखेरच्या श्वासापर्यंत ते काँग्रेस आणि गांधी घराण्याशी एकनिष्ठ राहिले. मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळातही 2002 मध्ये ते महसूलमंत्री होते. राज्याच्या मंत्रिमंडळात विविध खात्याचे मंत्रीपदही त्यांनी भूषवंलं आहे. काही काळ ते प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षही होते. पण राजकीय जीवनात त्यांना 1995 आणि 2004 मध्ये निलंगा विधानसभेत पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.