वैद्यकीय रुग्णालयात महिला कर्मचाऱ्याचा ड्युटीवरच मृत्यू

August 05,2020

चंद्रपूर : ५ ऑगस्ट - चंद्रपूर शासकीय वैद्यकीय रुग्णालय महाविद्यालयात एका महिला कर्मचारीचा ड्युटीवर असताना मृत्यू झाला आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे, रुग्णालयात वरिष्ठ डॉक्टर उपलब्ध न झाल्यामुळे या महिलेचा मृत्यू ओढावला.

4 ऑगस्ट रोजी रात्री नवजात शिशुच्या अतिदक्षता विभागात कर्तव्यावर असताना संगीता पाटील नामक कंत्राटी सहायक महिला कर्मचारी जागेवर कोसळली. त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. परंतु, संपूर्ण रात्रभर एमडी,एमएस किंवा स्पेशालिस्ट डॉक्टर्स उपलब्ध झाले नाही. त्यामुळे तिची तपासणी झाली नाही. अखेर तिचा मृत्यू झाला.

या दवाखान्यांमध्ये रात्रीच्या वेळी स्पेशलिस्ट डॉक्टरला कॉल करूनही ते लवकर हजर होत नाहीत. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा उपयोग तरी काय? असा प्रश्न कंत्राटी कामगारांच्या संघटनेनं केला आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. या ठिकाणी रात्री स्पेशलिस्ट डॉक्टरांना कॉल केला का? केला असेल तर डॉक्टर का आले नाही ? रूग्णावर तातडीने कोणते उपचार केले याची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी संघटनेनं केली आहे.

एकीकडे कर्मचाऱ्यांना 6 महिन्यापासून पगार नसल्याने कौटुंबिक तणावात वावरावे लागत आहे तर दुसरीकडे आणीबाणी व्यवस्थेत असलेले कर्मचारी कोविड काळात सातत्याने कार्यरत आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आपल्याच कर्मचाऱ्यांना अपेक्षित उपचार देऊ शकत नसेल तर संबंधितांवर कारवाई आणि मृतकाच्या वारसांना नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.