अयोध्येत राममंदिराचे विधिवत भूमिपूजन आणि शिलान्यास संपन्न

August 05,2020

अयोध्या : ५ ऑगस्ट - अखेर ज्या क्षणांची लाखो रामभक्त वाट पाहात होते, तो क्षण पार पडला. अयोध्येत रामजन्मभूमी स्थळी प्रभू रामाच्या मंदिर निर्माणाचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते पार पडलं. त्याआधी पंतप्रधान मोदी यांच्याहस्ते मुख्य पूजा पार पडली. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राममंदिर ट्रस्टचे प्रमुख महंत नृत्य गोपालदास हे उपस्थित होते.

बरोबर 12 वाजून 44 मिनिटे आठ सकंदांपासून 12 वाजून 44 मिनिटे आणि 40 सेकंद हा 32 सेकंदाच्या शुभमुहूर्तावर पंतप्रधान मोदींच्या हस्ते  भूमिपूजन पार पडलं.  सोशल डिस्टन्सिगचं पालन करत मुख्य पूजा त्याआधी पार पडली.  पायाभरणीसाठी पाया खोदण्यासाठी चांदीचं फावडं वापरलं गेलं तर चांदीची वीट यावेळी ठेवण्यात आली. त्याआधी पंतप्रधानांनी पारिजातकाचं वृक्षारोपण केलं. तर हनुमानगढीत त्याआधी त्यांनी पूजा केली. पंतप्रधानांनी हनुमानगढीत चांदीचा मुकुट अर्पण केला. अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि मंत्रोच्चाराच्या गजरात पूजाविधी आणि भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला.