धरणात बुडून युवकाचा मृत्यू

August 02,2020

नागपूर : २ ऑगस्ट - मित्रांसोबत सहलीला गेलेल्या एका युवकाचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बेला पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या रामा डॅम परिसरातील साहस कॅम्प नजीक घडली. तब्बल ११ तासांच्या अथक प्रयत्नानंतर मृतदेह बेला पोलिसांच्या हाती लागला. विपुल वीरेंद्र पटेल (२२), रा.  हनुमान नगर ,बुटीबोरी असे या मृतक तरुणाचे नाव आहे. 

प्राप्त माहितीनुसार मृतक विपुल पटेल व त्याचे मित्र  हे सर्वजण डॅम वर फिरायला गेले होते. फेरफटका मारल्यानंतर त्यांना पाण्यात पोहण्याची  इच्छा झाली. सर्वजण साहस कॅम्प नजीकच्या पाण्यात उतरले. विपुलचे मित्र पोहण्यात तरबेज असल्याने ते पाण्यात दूरवर गेले, मात्र विपुलला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. बराच वेळ होऊनही विपुल पाण्याबाहेर न आल्याने मित्र घाबरले. 

घटनास्थळाचा परिसर निर्जन असल्याने मदतीला कुणीच नव्हते. अखेर शुभम आणि रोहित या त्याच्या मित्रांनी त्वरित दुचाकीने बेला पोलीस स्टेशन गाठले. व ठाणेदारांना पूर्ण माहिती दिली. ठाणेदारांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत त्वरित घटनास्थळ गाठले व मच्छिमारांच्या मदतीने मृतदेहाचा शोध सुरु केला. 

मध्य रात्री अंधारामुळे शोधकार्य थांबवावे लागले मात्र आज पहाटेपासून शोधकाऱ्याला परत सुरुवात केली असता सकाळी ५.३० च्या सुमारास विपुलचा मृतदेह २० फूट खोल दगडाच्या कपारीत फसलेला आढळला. पोलिसांनी पंचनामा करून  मृतदेह ताब्यात घेतला व उत्तरीय तपासणीकरिता नागपूरला पाठविला. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.