वनाधिकाऱ्याचे महिला कर्मचार्यांशी असभ्य वर्तन, महिला समितीने केली शहानिशा

July 16,2020

गडचिरोली : १५ जुलै - गडचिरोलीच्या मुख्य वनसंरक्षक कार्याकायाअंतर्गत कार्य आयोजन विभागाचे प्रमुख असलेल्या उपवनसंरक्षक दर्जाच्या एका भारतीय  वनसेवेतील अधिकाऱ्याकडून महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तन केले जात असल्याची तक्रार महिला कर्मचाऱ्यांनी केली त्याआधारे वनविभागाच्या महिला तक्रार समितीने गडचिरोलीत भेट देऊन या प्रकरणाची शहानिशा केली. त्यात या समितीला कोणत्या बाबी निदर्शनास आल्या याचा अहवाल अजून मिळणे बाकी आहे. 

प्राप्त माहितीनुसार, सदर वनअधिकारी गेल्या तीन वर्षांपासून गडचिरोलीत कार्यरत आहे. यादरम्यान त्याचा महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत वागण्यातील असभ्यपणा वाढत गेल्यामुळे त्यांनी या प्रकरणाची सविस्तर तक्रार वनअधिकारी व कर्मचारी संघटनेकडे केली. त्यात एका महिला वनक्षेत्रपालासह इतर दोन महिला कर्मचाऱ्यांनी आपली आपबिती कथा केली . केबिनमध्ये बोलावून महिला कर्मचाऱ्यास लज्जा उत्पन्न होईल अशा शब्दात बोलणे, महिलांच्या समस्या आणि मर्यादांचा विचार न करता हेतुपुरस्पर त्रास देण्यासाठी फिल्डवर पाठवणे, काम व्यवस्थित करत नसल्याचे सांगून कारवाई करण्याची धमकी देणे, जवळीकता साधण्याचा प्रयत्न करणे, महिला कर्मचाऱ्यांच्या राजा मंजूर न करणे, असे अनेक आरोप तक्रारकर्त्या महिला अधिकारी, व कर्मचाऱ्यांनी केले आहेत.सदर अधिकाऱ्याच्या या वागण्याचा अतिरेक झाल्यामुळे आपण त्रस्त  झालो असून त्याच्या केबिनमध्ये जाण्याचीही भीती वाटत असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. 

महिला कर्मचाऱ्यांच्या या तक्रारीनंतर वनपरिक्षेत्र अधिकारी संघटना,वनसंरक्षक व पदोन्नत वनपाल संघटना आणि सामाजिक वनीकरण कार्यालयीन कर्मचारी संघटना आदी संघटनांनी मुख्य वनसंरक्षकाकडे तक्रार करून उपवनसंरक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.