मासोळी पकडण्याच्या मोहाने गेलेल्या तरुणाचा नदीत बुडून मृत्यू

July 16,2020

नागपूर : १६ जुलै- सहकारी मित्रांसह कोलार नदीत मोसोळी पकडण्याच्या मोहात पाण्याच्या प्रवाहाने एक युवक वाहत गेल्याची घटना काल सकाळच्या सुमारास घडली जितेंद्र उर्फ बाप्या जीवनलाल उईके (२७), रा. वार्ड क्र. १, चिंचोली असे मृत युवकाचे नाव आहे. 

जितेंद्र आज सकाळी मित्र सुधीर शिवा सोनावणे (२६), विशाल शिवा सोनावणे (१९), आकाश इरपाची (२७), यांच्यासह कोलार नदीत मासोळ्या पकडण्यासाठी गेला होता. सहापैकी चौघे  जण नदीकाठावर होते तर जितेंद्र व आकाश नदीत जाळे टाकून मासोळ्या  पकडत होते. दरम्यान, अचानक पुराच्या पाण्यामुळे नदीतील पाण्याची पातळी वाढू लागली, यामुळे दोघेही पाण्याच्या प्रवाहासोबत वाहू लागले. आकाशला पोहता येत असल्यामुळे तो जितेंद्रला हात पकडून पाण्याच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागला. पण अचानक जोरदार पाण्याचा प्रवाह आला व आकाशच्या हातातून जितेंद्रचं हात सुटला . यामुळे जितेंद्र प्रवाहासोबत दूरवर वाहत गेला. इतर मित्रांनी त्वरित खापरखेडा पोलिसांना सूचना दिली. माहिती मिळताच खापरखेड्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत काळे आपल्या ताफ्यासोबत घटनास्थळी दाखल झाले. निमगडे यांच्या नेतृत्वात एका टीमने नदीकाठावर जितेंद्रच्या मृतदेहाची शोधमोहीम सुरु केली. पण बऱ्याच उशिरापर्यंत त्याचा मृतदेह हाती लागत नव्हता. खापरखेडा पोलिसांनी सावनेर येथून रेस्क्यू टीमला पाचारण करण्यासाठी तहसीलदारांना फोन केला. याशिवाय पटवारी मोहितकर  यांनाही माहिती दिली. पण रात्री उशिरापर्यंत जितेंद्रचा मृतदेह हाती लागला नव्हता.