नागपुरात पकडला २ हजार किलो गांजा

July 16,2020

नागपूर : १६ जुलै - महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) रीजनल युनिट नागपूरने २ हजार किलो गांजासह ६ तस्करांना अटक केली आहे. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत ३ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे या गांज्याची बस आणि ट्रकमध्ये भरून वाहतूक केली जात होती. 

'डीआरआय' ला गांजाची मोठी खेप येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. ११ जुलै रोजी एक वॉल्वो बस (एपी 0७ टीयू 000१) च्या शोधात पोलिस गुंतले होते. तपासात मिळालेल्या माहितीवरून ही बस छत्तीसगडच्या सीमेपासून उत्तरप्रदेशच्या सीमेकडे जात असल्याचे कळले. डीआरआयच्या टीमने उत्तरप्रदेश पोलिसांच्या मदतीने या बसला पकडले. बसमध्ये १ हजार ४१0 किलो गांजा मिळून आला. हा गांजा पोलिसांनी जप्त केला. या गांजाची अनुमानित किंमत २ कोटी ११ लाख ५0 हजार रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. बसमध्ये ८ तस्कर होते. यातील ३ पकडण्यात आले. इतर आरोपी तस्कर हे फरार झाले. दुसरी कारवाई १४ जुलै रोजी मौदा येथे करण्यात आली. ट्रक क्रमांक (एमएच १६ एई ५७४५) मधून गांजाची तस्करी करण्यात येत होती. 

ट्रकच्या पुढे स्विफ्ट डिजायर कार (एमएच १४ सीसी १८१७) एस्कॉर्ट करीत होती. मौदा येथील टोल नाक्यावर कार आणि ट्रकला थांबविण्याचे प्रयत्न करण्यात आले. परंतु, ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला. त्याला पुढे काही अंतरावर पकडण्यात आले. या ट्रकमधून ६७३ किलो गांजा जप्त करण्यात आला. या गांजाची किंमत ९५ लाख ५५ हजार ३00 रुपये सांगण्यात येत आहे. या कारवाईत ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.