लूटमार करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या पाच व्यक्तींना अटक

July 13,2020

यवतमाळ : १३ जुलै - तीन लाखांचे आमिष दाखवून एक लाखाची लूटमार करून जीवे मारण्याची धमकी देऊन फसवणूक केल्याप्रकरणी  यवतमाळ जिल्ह्यात मारेगाव पोलिसांनी पाच आरोपीस अटक करण्यात आली आहे.

 

राजू भुजाडे (वय 42), अरिंवद चौगुले (वय 46), लीलाधर मुरस्कर (वय 48), अविनाश जांभुळकर (वय 29), मारोती पवार (वय 44) सर्व रा. मारेगाव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

 

महेंद्र ईश्वरलाल तिवारी (वय 39, रा. भद्रावती) यांना तीन आठवड्यापूर्वी आरोपी राजू भुजाडे याने, ‘तुम्ही मला 1 लाख रुपये द्या, मी तुम्हाला 3 लाख रुपये देतो’ असे आमिष दाखवले. तक्रारी कर्जबाजारी असल्याने, आपले कर्ज फिटेल या आशेने तीन लाखांच्या प्रलोभनात पडले.

शनिवार, 11 जुलै रोजी सकाळी 11 च्या सुमारास आरोपी राजू भुजाडेने तिवारी यांना फोन करून सांगितले की, अरिंवद चौगुले नामक माझा माणूस दुचाकीने भद्रावती येथे आला आहे. त्याच्यासोबत तुम्ही 1 लाख रुपये घेऊन वणीला या. त्याप्रमाणे तक‘ारदार महेंद्र तिवारी सोबत मामेभाऊ मनोज मुरलीधर शर्मा यांना दुचाकी सुझुकी एमएच34 जे2253 ने भद्रावतीला आलेला अरिंवद चौगुले सोबत वणीला आले.

वणी येथे येताच आरोपी राजू भुजाडे यांनी फोन करून मारेगाव येथे येण्यास सांगितले. तिवारी यांच्यासोबत असलेला आरोपी अरिंवद चौगुले यांनी मांगरुळ गावाजवळ थांबून राहण्यास सांगितले व तो मारेगावकडे निघून गेला. रात्री 8.30 च्या दरम्यान चौगुलेसोबत अविनाश जांभुळकर, लीलाधर मुरस्कार, मारोती पवार हे इसम आल्याने तिवारी यांनी त्याला हे लोक कोण आहे, असे विचारले असता हे सर्व आमचे सहकारी आहेत, घाबरायचे कारण नाही असे त्याने सांगितले.

दरम्यान, राजू भुजाडे यांनी तिवारी यांना ठरल्याप्रमाणे 2 हजार रुपयांचे बंडल दाखवून 1 लाख रुपये मागितले. 2 हजार रुपयांचे बंडल असलेल्या 3 लाखांच्या (चिल्ड्रेन बँक) लहान मुलांच्या खेळण्यातील बनावट नोटा असल्याचे तिवारी यांच्या निदर्शनास आले.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिवारी यांनी आपले 1 लाख रुपये घेऊन घटनास्थळावरून पाय काढला. त्यावेळी मारोती पवार, लीलाधर मुरस्कार, अविनाश जांभुळकर, राजू भुजाडे, अरिंवद चौगुले यांनी हातात काठी घेऊन त्यांना घेरले. तिवारी यांना तू पैसे नाही दिले तर जीवे मारून टाकणार, अशी धमकी देत तिवारीजवळचे 1 लाख रुपये बळजबरीने हिसकावून घेतले व घटनास्थळावरून पोबारा केला.

दरम्यान महेंद्र तिवारी यांनी आरोपीच्या दुचाकी एमएच29 इ8542 हा क‘मांक लक्षात ठेवून मारेगाव पोलिस ठाणे गाठले. तिवारी यांच्या तक्रारीवर 395, 489, डई 506 अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस मारेगाव पोलिसांनी काही तासातच पाचही आरोपींना गजाआड केले. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी सुशील नायक यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक जगदीश मंडलवार, उपनिरीक्षक अमोल चौधरी यांनी केली.