बालाजी मंदिराच्या दानपेटीत भक्ताने टाकली २० सोन्याची बिस्किटे, वजन २ किलो

July 13,2020

तिरुपती : १३ जुलै - सर्वात श्रीमंत देवस्थानापैकी एक असलेल्या आंध्रातील तिरुपती बालाजीला एका अज्ञात भक्ताकडून सोन्याच्या २० बिस्किटाचे दान चढविण्यात आले. मंदिराच्या हुंडीमध्यें एकूण २ किलोग्रॅम वजनाचे सोन्याचे बिस्कीट दान स्वरूपात मिळाल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करत भक्तांना दर्शनासाठी परवानगी दिली जात आहे. 

दिवसभरातील जमा झालेले. दान गोळा केले जात असतांना हुंडीमध्ये सोन्याचे बिस्कीट मिळाले. कोरोना संकटामुळे इतर देवस्थानांप्रमाणे बंद ठेवण्यात आलेले नळाजी मंदिर ११ जूनपासून पुन्हा उघडण्यात आले. मंदिर भाविकांसाठी खुले झाल्यापासून महिनाभरात भक्तांकडून रोख स्वरूपात १६. ७ कोटी रुपयांचे दान जमा झाल्याची माहिती टीटीडीचे कार्यकारी अधिकारी अनिल कुमार सिंघल यांनी दिली. कोरोना संकटातही जवळपास २.५ लाख भाविकांनी बालाजीचे दर्शन घेतले. तर दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंग करणारे जवळपास ६७ हजार भाविक कोरोनासह विविध कारणामुळे दर्शनाला येऊ शकले नाही. टीटीडी स्टाफने आपल्या ३५६९ कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली होती, त्यापैकी ९१ जण पॉसिटीव्ह आढळले आहेत.