लॉकडाऊनचे नियम धाब्यावर बसविणाऱ्या वर्धा भाजप नेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल

July 05,2020

वर्धा : ५ जुलै - लॉकडाऊनचे नियम धाब्यावर बसवत  वर्ध्याच्या भाजप कार्यालयात नवनियुक्त भाजप नेत्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला वर्ध्याचे आमदार पंकज भोयर हेदेखील उपस्थित होते 

पोलिसांना कार्यक्रमाची माहिती मिळताच ते भाजप कार्यालयात दाखल झाले. त्यांनी तातडीने कार्यक्रम बंद पाडला. याप्रकरणी संबंधित भाजप नेत्यांवर रामनगर पोलील ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीत वर्ध्याचे राजेश बकाने यांची सचिवपदी निवड झाली आहे. त्यामुळे त्यांचा सत्कार सोहळा भाजप कार्यालयात आयोजित करण्यात आला. या सत्कार सोहळ्याला वर्ध्याचे भाजप आमदार पंकज भोयर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती लावली. याबाबत वर्ध्याच्या तहसीलदारांना माहिती मिळाली. त्यांनी पोलिसांना माहिती देत चौकशीचे आदेश दिले.

कार्यक्रमाची माहिती मिळताच पोलीस भाजप कार्यालयात दाखल झाले. त्यावेळी त्यांना कार्यालयात कार्यक्रम सुरु असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी आयोजकांना तातडीने कार्यक्रम बंद करण्याचे आदेश दिले.

याप्रकरणी भाजप शहराध्यक्ष पवन परियाल, प्रशांत इंगळे, गुडू कावळे, सुनिता ढवळे, मंजुषा दुधबडे, प्रशांत बुर्ले, विरु पांडे, निलेश किटे, नगरपालिका उपाध्यक्ष प्रदीपसिंग ठाकूर, श्रीधर देशमुख, शीतल ठाकरे, गिरीष कांबळे, अशोक कलोडे यांच्यासह आणखी 40 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला.

रामनगर पोलिसांच्या गोपनीय शाखेच्या कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) चे उल्लंघन, याशिवाय संचारबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कलम 135 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.