रायगढहून आलेले ५ महावितरण कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

July 05,2020

वर्धा : ५जुलै - चक्रीवादळामुळे कोकणात खंडित झालेला वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम करून परत आलेले वीज वितरण विभागाचे आणखी ५ कर्मचारी आज रविवार ५ रोजी कोरोना बाधित असल्याचे निदान झाले. यात ३ कर्मचारी हिंगणघाट तर दोन देवळी तालुक्यातील पुलगाव येथील असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली. शनिवार ४ रोजी वीज वितरणचे ३ कर्मचारी आढळून आले होते.

कोकणात चक्रीवादळामुळे नुकसानग्रस्त भागातील वीज वितरण विभागाची दुरुस्तीची कामे करण्यासाठी २० कर्मचारी वर्धा जिल्ह्यातून गेले होते. परतल्यानंतर त्यातील ३ कर्माचारी काल कोरोना बाधित निघाल्यावर उर्वरित कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यातील आज प्राप्त १२ अहवालात ५ व्यक्ती कोरोनाबाधित निघाल्या आहेत. तर २ नेगेटिव्ह आणि ५ अहवाल इनकनक्लुसिव्ह आहेत. यामध्ये ३ कर्मचारी हिंगणघाट मधील असून एक पुलगाव आणि एक विजयगोपाल येथील आहे. हिंगणघाट मधील बाधित कर्मचाऱ्यांना सेवाग्राम रुग्णालयात तर देवळी मधील रुग्णांना सावंगी मेघे येथील रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

 या रुग्णासहित जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या २७ झाली असून त्यातील १२ कोरोनामुक्त तर १४ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. एकाचा पूर्वीच मृत्यू झाला आहे.