शौक पूर्ण करण्यासाठी वाहने चोरणाऱ्या चोराला केली अटक

July 05,2020

नागपूर : ५ जुलै - फक्त शौक पूर्ण करण्यासाठी वाहने चोरणाऱ्या एका चोराला बेलतरोडी पोलिसांनी काल अटक केली आहे. विशेष म्हणजे हा चोर नुकताच तुरुंगातून सुटून आलेला होता. 

 माणसाला असलेले शौक  पूर्ण करण्यासाठी काही व्यक्तींची  कुठल्याही थराला जाण्याची त्याची तयारी असते. बेलतरोडी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीही  महागडे वाहन चालविण्याचा शौक आहे, परंतु तशी वाहन विकत घेण्याची त्याची आर्थिक स्थिती नाही. मग तो चक्क चोरी करून मनसोक्त आनंद लुटायचा, इच्छा पूर्ण होताच ते चोरीचे वाहन कुठेतरी सोडून निघून जायचा पुन्हा दुसऱ्या वाहनाच्या शोधात फिरायचे. अशा या वाहन चोराला बेलतरोडी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध घेऊन अटक केली.

शरद कातलाम असे त्या वाहनचोराचे नाव आहे. तो कधी आईकडे तर कधी आजीकडे राहातो. तो २१ वर्षाचा असला तरीही त्याच्यावर वयाच्या दुप्पट म्हणजेच ४२ गुन्ह्यांची नोंद असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी दिली. 

२२ ते २५ जून दरम्यान फिर्यादी संजय कोवे यांनी त्यांची दुचाकी अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये ठेवली. मात्र ते वाहन तिथे नव्हतेच. या प्रकरणी त्यांच्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलिसांनी वाहनचोरीचा गुन्हा नोंदविला. दरम्यान बेलतरोडी पोलिसांनी गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी मनीषनगर रेल्वे क्रॉसिंग ते सीताबर्डी भागातील खासगी आणि सीओसीचे सीसीटीव्ही कॅमेरे पाहणी केली असता एक काळ्या रंगाची केटीएम गाडी गुन्ह्यात चोरी गेलेल्या वर्णनाची दिसून आली. दरम्यान तो तेलंगखेडी परिसरातील फुटला भागात काळ्या रंगाच्या केटीएम बाईकवर फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी त्याला पकडले. त्याची चौकशी केली असता चोरीत त्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडून चोरीचे वाहन जप्त करण्यात आले.