अंतरातील ज्योत जागव विश्व गाईल आरती नागपूरच्या धरमपेठ शिक्षण संस्थेने तयार केला सकारात्मकतेचा संदेश देणारा संगीतमय व्हिडिओ

July 03,2020

सध्या सकल विश्वाला कोरोनाच्या संकटाने ग्रासून टाकले आहे. जगभर लाखो व्यक्ती कोरोनाबाधित झाल्या आहेत तर मृत्यू संख्याही लक्षणीय आहे. जगभरातील अर्थचक्र सध्या थांबलले आहे म्हटल्यास वागवे ठरणार नाही. असंख्य नागरिकांच्या नोकर्या गेल्या असून रोजीरोटी बंद झाली आहे. परिणामी संपूर्ण जगावर नैराश्याची सावली पसरलेली दिसते आहे. 

अशावेळी सकारात्मकता निर्माण करण्यासाठी कला क्षेत्रच पुढाकार घेऊ शकते. साहित्य, नाट्य, संगीत अशा माध्यमातून जनसामान्यांचे नैराश्य दूर करून सकारात्मकतेची भावना निर्माण करीत संकटांशी लढण्याचा जोश कलेच्या माध्यमातूनच निर्माण केला जाऊ शकतो. अगदी इतिहासकाळापासून रणदुंदुभी वाजवूनच उत्साह निर्माण केला जात होता ना! 

असाच सकारात्मकतेचा संदेश देत भारतीयांमध्ये जोश निर्माण करण्याचा प्रयत्न नागपूरच्या धरमपेठ शिक्षण संस्थेने केला आहे. संस्थेचे कल्पक आणि सामाजिक भान जपणारे अध्यक्ष अॅतड. उल्हास औरंगाबादकर आणि रत्नाकर केकतपूरे यांच्या संकल्पनेतून संस्थेने एका ओजस्वी गीताचा व्हिडिओ तयार केला असून नुकतेच त्याचे लोकार्पण झाले. 


छायेत जग जरी संकटाच्या, धीर धर तू भारती।

अंतरातील ज्योत जागव, विश्व गायिल आरती॥


या धृपदाने सुरू होणारे हे गीत धरमपेठ महाविद्यालयातील एक प्राध्यापक असलेले कवी विनय मोडक (यथार्थ) यांनी रचले आहे. या गीताला स्वरसाज चढवून सर्व गायक कलावंतांकडून हे गीत गाऊन घेण्याचे आणि त्याला समर्पक असा व्हिडिओ बनविण्याचे शिवधनुष्य धरमपेठ महाविद्यालयातील संगीताच्या विभाग प्रमुख आणि देशाला स्वातंत्र्यानंतर 70 वर्षांनी प्रथमच लष्कराची भारतीय सुरावटीची मार्शल ट्यून संगीतबद्ध करून देणार्या नागपूरच्या डॉ. तनूजा नाफडे यांनी पेलले आहे. 

डॉ. तनूजा नाफडे यांनी संगीतबद्ध केलेल्या या गीतात स्वतः डॉ. नाफडे, अॅरड. उल्हास औरंगाबादकर, रत्नाकर केकतपुरे, डॉ. अविनाश जोशी, निलेश सावरकर, यशश्री भावे, प्राची मुळे आणि नेहा इंदूरकर या गायक कलाकारांचा सहभाग राहिला आहे. विशेष म्हणजे हे सर्व कलाकार धरमपेठ शिक्षण संस्थेशी विद्यार्थी वा शिक्षक वा पदाधिकारी म्हणून संबंधित आहेत. संगीत संयोजन पुष्कर देशमुख,दृश्य संकलन सतीश यादव यांचे आहे. तर चारुदत्त जिचकार यांनी तबल्यावर, पुष्कर देशमुख यांनी सरोदवर आणि निशीकांत देशमुख यांनी व्हायोलिनवर साथसंगत करीत हे गीत सुश्राव्य केले आहे. 

सुमारे सात मिनिटांचा हा व्हिडिओ नुसताच श्रवणीय नाही तर प्रेक्षणीय ही झालेला आहे. मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियापासून सुरु झालेल्या या व्हिडिओचा शेवट डौलाने आकाशात फडकणार्या भारतीय तिरंगा राष्ट्रध्वजाने केला आहे. यात भारतीय इतिहास आणि निसर्गाचे वैभव तसेच प्रगतीचे दृश्य दाखवणारी विविध चित्रे तर आहेतच पण कोरोनामुळे निर्माण झालेल्या संखटाची दृश्यही यात दाखवण्यात आली आहे. हे दृश्य नियोजनही डॉ. नाफडे यांचेच असून आपण फक्त संगीतकार नसून कुशल दिग्दर्शकही असल्याचे त्यांनी सिद्ध केले आहे.  हे गीत संपूर्णतः भारतीय सुरावटींनी संगीतबद्ध केले असून यमन आणि पुरीयाधनश्री या रागांमध्ये संगीताची बांधणी केली आहे. हे गीत ऐकल्यावर आणि व्हिडिओ बघितल्यावर कोणत्याही श्रोत्याच्या मनात निश्चित सकारात्मक ऊर्जेची भावना निर्माण होते अशा प्रतिक्रिया अनेक जाणकारांनी दिल्या आहेत. 


धरमपेठ कला वाणिज्य महाविद्यालयात संगीत विभाग प्रमुख असलेल्या डॉ. तनूजा नाफडे यांनी भारतीय लष्कराला स्वातंत्र्यानंतर प्रथमच शंखनाद ही भारतीय सुरावटीची मार्शल ट्यून संगीतबद्ध करून दिली आहे. याशिवाय भारतीय प्रादेशिक सेनेसाठी देखील त्यांनी गीत संगीतबद्ध केले असून लष्करी अधिकार्यांच्या पत्नींची राष्ट्रव्यापी संघटना असलेल्या आवा या संघटनेचे गीतही त्यांनी संगीतबद्ध केले आहे. विशेष म्हणजे या सर्व सेवा त्यांनी देशासाठी काहीतरी करण्याची संधी मिळाली आहे असे सांगून विनामूल्य दिल्या आहेत. याशिवाय त्यांचा रंग दे या नावाने ख्यातनाम गायक हरीहरनजी यांच्या समवेत एक व्हिडिओ अल्बम प्रकाशित झाला आहे. त्याचबरोबर आणखीही दोन अल्बम प्रसिद्ध झाले असून त्यातील गाणी प्रचंड गाजलेली आहेत. भारतीय संगीताचे पाश्चिमात्य वाद्यांबरोबर फ्यूजन करून संगीत सादर करण्याचा कार्यक्रम रशियातील भारतीय दूतावासात त्यांनी सादर केला आहे. 

प्रस्तुत गीताच्या प्रत्येक ओळीत सकारात्मकता आणि विश्वास जागविण्याचा प्रत्यय येतो. त्यातील काही ओळी अशा आहेत. 


संयमाची कास धर तू सरुन जाईल वेळ ही

हात दे विश्वास ठेवून आर्त एक ही हाक ही 

साखळी दृढ एकतेचे ठेव आस तू जागती

अंतरातील ज्योत जागव विश्व गायील आरती 


अशा शब्दात भारतीयांचा विश्वास जागवणारे हे गीत यु-ट्युबवर ऐकण्यासाठी https ://youtu.be/Duq8lk2ifbQ या यूट्यूब लिंकवर जाऊन ऐकता येईल. या गीताला यू-ट्युबवर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. 

                                                                                   

                                                                     अविनाश पाठक