कोरोना झाल्याचे ओरडत घेतला गळफास

June 29,2020

नागपूर : २९जून - मला हात लावू नका, मला कोरोना आहे... मला हात लावू नका, कोरोना झाला आहे.... असे बडबडत एका मद्यपीने घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. पण, प्रत्यक्षात त्याला कोरोना नव्हता, पण मनावर परिणाम झाल्याने त्याने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. संजय सूर्यकांत हाडके (४०) असे मृतकाचे नाव आहे. 

पोलिसांच्या माहितीनुसार, संजय हा मजूर होता. एमआयडीसी पोलीसठाण्याच्या  हद्दीतील जयताळा नालंदा बुद्धविहारजवळ तो राहत होता, पण गेल्या तीन महिन्यापासून काहीही कामधंदा नसल्यामुळे तो दारूच्या आहारी गेला होता. दारू पिऊन घरी, रस्त्यावर पडून राहत होता. वाचण्या, बोलण्यात, सांगण्यात त्याच्या कानावर कोरोना आणि त्याचे गांभीर्य पडू लागल्याने तो वेड्यासारखा वागत होता. २७ जून रोजी तो दुपारी दारू पिऊन घरी आला आणि मला हात लावू नका, कोरोना झाला आहे... असे बडबडू लागला. जवळपास तीन ते चार तास तो बडबडत होता. 

दारू पिऊन असल्यामुळे कोणीच त्याच्याकडे लक्ष दिले नाही, पण दुपारी ३.१५ वाजताच्या सुमारास त्याने राहत्या घरातील लाकडी बल्लीला ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. अचानक बडबड करीत असलेला संजय शांत कसा झाला म्हणून त्याच्या कुटुंबीयांनी घरातील आतील खोलीत जाऊन बघितले असता तो गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी फिर्यादी सूर्यकांत हाडके (६०) यांनी दिलेल्या सूचनेवरून एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास  सुरु केला.