नागपूरात खासगी रुग्णालये अधिग्रहीत करण्याची वेळ येणार नाही जिल्हाधिकारी

May 25,2020

नागपूर, 25 मे - महाराष्ट्र शासनाने खासगी इस्पितळातील 80 टक्के खाटा ताब्यात घेण्याचा शासन निर्णय घेतला. तरीही नागपूरमध्ये कोरोनाबाधितांची संख्या पाहता तेवढ्या खाटांचे अधिग्रहण करण्याची गरज पडणार नाही, अशी हमी  जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली. राज्य शासनाच्या खाजगी हॉस्पिटलसंबंधित निर्णयावर नागपूरचे जिल्हाधिकारी ठाकरे यांनी विदर्भ हॉस्पिटल्स असोसिएशनसोबत समन्वयक बैठक आयोजिली होती. यावेळी ठाकरे यांनी नागपुरात  को्विड-19 च्या उपचारासाठी तीन हजहार खाटा उपलब्ध असल्याची माहिती दिली.

त्यामध्ये मेडिकल, मेयो, मनपाचे इस्पितळे, खासगी वैद्यकीय महाविद्यालयाचे इस्पितळ आणि धर्मदाय इस्पितळांचा समावेश आहे. जर या इस्पितळाची रुग्ण सामावून घेण्याची मर्यादा संपली तर शासन निर्णयाच्या अंमलबजावणी संदर्भात चर्चा करण्यात येईल, अशी माहिती यावेळी ठाकरे यांनी दिली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पातूरकर यांनी कोविड-19 नसलेल्या रुग्णाचा उपचार पूर्ववत करीत राहण्याचे आवाहन केले. मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण गंतावार  यांनी सगळ्या आरोग्यसेवकांना नियमानुसार पीपीई घालण्याचा सल्ला दिला. आणि सर्व नियमांचे पालन केले असेल तर नव्या नियमानुसार कोविड-19 च्या रुग्णांच्या  संपर्कात आल्यास क्वारंटाईन होण्याची आवश्यकता नसल्याचे त्यांनी  सांगितले. तर विदर्भ हॉस्पिटल्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अशोक अरबट म्हणाले की, आरोग्य मंत्रालयाने खासगी इस्पितळांना कोविड-19 साठी कशा पद्धतीने वापरले पाहिजे, याची मार्गदर्शन सूचना दिली असून त्याचे पालन व्हावे, असे  सुचविण्यात आले आहे. या बैठकीला व्हीएचएचे 90 हून अधिक सदस्य उपस्थित होते.