नागपुरात पारा वाढला, उष्माघाताने दोघांचा मृत्यू

May 25,2020

नागपूर, 25 मे - उशिरा सुरू उन्हाळा आता चांगलाच तापू लागला आहे. गेल्या चार दिवसांपासून शहरातील तापमानात सातत्याने वाढ होत आहे. काल नागपूर देशातील दुसर्‍या क्रमांकाचे तर जगातील आठव्या क्रमांकाचे उष्ण शहर ठरले  आहे. उष्माघाताने दोघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका महिलेचा समावेश आहे.

पहिली घटना कळमेश्‍वरपासून 9 किमी अंतरावरील निमजी खदान येथे घडली. रत्ना पवार या उपाशी उन्हात असल्याने त्यांची प्रकृती खालावली. नातेवाईकांनी डॉक्टरांकडे नेले असता डॉक्टरांनी तपासून रत्ना यांंना मृत घोषित केले. दुसरी घटना नागपूरच्या लकडगंजमधील गंगा जमना परिसरात घडली. फुटपाथवर एका 55 वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह आढळा. उष्माघाताने त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली  आहे. देशात राजस्थान येथील चुरू येथे सर्वाधिक 47.4 अंश तापमानाची नोंद करण्यात आली. त्याखालोखाल नागपूर आणि पिलानी येथे प्रत्येक 46.7 अंश तापमानाची नोंद करण्यात आली. हा नागपूरचा या मोसमातील उच्चांक ठरला.  हवामान खात्यानुसार, विदर्भात उष्णतेची लाट आहे. नागपूरखालोखाल चंद्रपूर येथे 46.6 तर अकोला 46.1 अंश इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे.