नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या 423; 340 रुग्णांना डिस्चार्ज

May 25,2020

नागपूर, 25 मे - कोरोनाचा प्रकोप वाढत असून इतर जिल्हा, राज्यातून विशेषतः नागपूर जिल्ह्यात प्रवेश करणार्‍या व्यक्तींमुळे नागपूरलगतच्या ग्रामीण भागात बाधित रुग्ण आढळून येत आहेत. काल नव्या सहा रुग्णांची भर पडली आहे. यात  विलगीकरण कक्षात रुग्णसेवा देणार्‍या नरेंद्रनगर येथील एका महिला डॉक्टरचाही समावेश आहे. तर दोन रुग्ण मोमीनपुरा, दोन जवाहरनगर व एक रुग्ण गड्डीगोदाम येथील आहे. या सहा रुग्णांसह नागपूरची रुग्णसंख्या 423 वर पोहोचली  आहे. आतापर्यंत 340 रुग्णांना घरी पाठविण्यात आले आहे.

नागपूरच्या बजाजनगर, खामला, जरीपटका, सतरंजीपुरा, मोमीनपुरा, पार्वतीनगर, पांढराबोडी, शताब्दीनगर, जवाहरनगर, मोठा ताजबाग, दिघोरीनंतर आता नरेंद्रनगर भागातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. नरेंद्रनगर येथील महिला  डॉक्टरची नियुक्ती आमदार निवासातील विलगीकरण केेंद्रात करण्यात आली होती. त्या अत्यावश्यक कामानिमित्त सुटीवर होत्या. सुटी संपल्यानंतर त्या आमदार निवासात सेवेत रुजू झाल्या. त्यापूर्वी त्यांची कोरोना तपासणी करण्यात आली  होती. त्याची चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे सुटीच्या काळात या महिला डॉक्टर किती लोकांच्या संपर्कात आल्या होत्या. याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून घेतली जात आहे.

नागपुरात पहिल्यांदाच डॉक्टर पॉझिटिव्ह निघाले आहेत. तर माफसूच्या प्रयोगशाळेतून जवाहरनगर येथील दोन महिला तर एम्सच्या प्रयोगशाळेतून गड्डीगोदाम येथील एक महिला रुग्ण पॉझिटिव्ह आली आहे. यापूर्वी दक्षिण नागपुरातील मानेवाडानजीकच्या जवाहरनगर येथील एकाच कुटुंबातील 3 जण पॉझिटिव्ह आढळून आले होते.