लॉकडाऊन आणि मी - भारतीय उद्योगजगत पुन्हा नव्याने उभरून येईल मिलिंद कानडे

May 24,2020

लॉकडाऊन आणि मी

जेव्हा जंगलाला आग लागते तेव्हा जंगलातील वृक्षवेली जळून बेचिराख होतात. मात्र आग विझल्यावर त्याच राखेतून तेच जंगल पुन्हा नव्याने उभरून उभे राहते. तसाच प्रकार भारतातील उद्योग जगताच्या बाबतीत होणार आहे. कोरोनाच्या  आलेल्या संकटामुळे देशभरातील उद्योगांना जबरदस्त फटका बसला हे खरे आहे. मात्र आता नव्याने सुरू होणारे उद्योग वर्षभराच्या आत उभरून येत फोफावतील आणि भारताचे औद्योगिक विश्‍व पुन्हा एकदा समृद्ध झालेले दिसेल असा  विश्‍वास ज्येष्ठ उद्योगपती आणि बुटीबोरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे सचिव मिलिंद कानडे यांनी व्यक्त केला.

नागपूर इन्फोच्या लॉकडाऊन आणि मी या स्तंभात आज मिलिंत कानडे यांनी आजच्या औद्योगिक परिस्थितीवर आपली परखड मते मांडली. नागपूर इन्फोचे सल्लागार संपादक अविनाश पाठक यांनी त्यांना बोलते केले.

यावेळी बोलताना कानडे म्हणाले की, कोरोनाचे संकट लक्षात घेता पंतप्रधानांनी तातडीने लॉकडाऊनचा निर्णय जाहीर केला हे योग्यच होते. मात्र हा निर्णय जाहीर करताना उद्योगांना काही वेळ द्यायला हवा होता. अवघ्या चार तासात चालू उद्योग बंद करणे अनेकदा शक्य नसते. तसे केले तर यंत्रसामुग्रीचे प्रचंड नुकसान होते. ही बाब लक्षात घेऊन नियोजन व्हायला हवे होते असे मत त्यांनी व्यक्त केले. पंतप्रधानांनी घोषणा केल्यावर आम्ही संघटनेच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना भेटून परिस्थिती समजवून सांगितली आणि उद्योग पूर्णतः बंद करण्यासाठी लागणारा वेळ मंजूर करून घेतला.

उद्योगांच्या बाबतीत कामगारांचाही प्रश्‍न निर्माण झाला. त्यांचे काम बंद झाल्यावर त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न निर्माण झाला. यावेळी आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून आणि इतर विविध संघटनांच्या मदतीने एमआयडीसी क्षेत्रातील  अकुशल कामगारांच्या भोजनाची काही दिवस सोय करून दिली. जर योग्य धोरण आखून हा निर्णय घेतला असता तर या कामगारांना अशी धावपळ करावी लागली नसती. शेवटी हे कामगार रस्त्यावर येऊन आपापल्या गावाकडे जमेल तसे  रवाना झालेले आपण बघितलेच आहे.

सुमारे दीड महिना उद्योग बंद राहिल्यावर आता परत उद्योग सुरू करायचे आहे. उद्योग सुरू करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण उद्योग सुरू झाले तरच देशाचे अर्थचक्र सुरू राहणार आहे. मात्र आज महाराष्ट्रात तरी उद्योग परत सुरू  करायला मोठ्या अडचणी येणार आहेत. त्यात सर्वात मोठी अडचणी असेल ती कामगारांची. आज बहुसंख्य उद्योगांमधील अकुशल आणि अर्धकुशल कामगार आपापल्या गावी रवाना झाले आहेत. पुढील सहा महिने तरी ते परत येण्याची  शक्यता नाही. अशावेळी नवीन कामगार तयार करण्याचे आव्हान उद्योजकांना पेलावे लागेल. आम्ही उद्योग संचालनालयाच्या मार्फत अकुशल कामगारांना प्रशिक्षित करण्यात येते, तेथे संपर्क साधून तिथून कामगार मिळवतो आहोत.  याशिवाय सरकारला मनरेगामार्फतही कामगार द्यावे म्हणून विनंती केली आहे. या कामगारांना आम्हाला आधी प्रशिक्षित करावे लागेल आणि मगच ते कामगार उद्योगांच्या उपयोगाचे राहतील. हा त्रास उद्योगांना सहन करावा लागणार आहे.  मात्र शो मस्ट गो ऑन या न्यायाने आम्हाला उद्योग चालूच ठेवावे लागतील.

अचानक उद्योग बंद पडल्यामुळे अनेक उद्योग चालकांच्या अडचणींमध्ये लॉकडाऊनच्या दरम्यान प्रचंड वाढ झाली होती. त्यामुळे लॉकडाऊन सुरु झाल्यावर क्षणाचीही उसंत न घेता या समस्या कशा सोडवता येतील यावर आम्ही लक्ष दिले. त्यासाठी उद्योजकांचे वर्ग घेणे सुरु केले. झुम मिटिंग्ज आयोजित केल्या. या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी सर्वस्तरावर अधिकारी, मंत्री, लोकप्रतिनिधी यांचेशी संवाद साधण्याचेही आमचे काम सुरुच होते. बँकांच्या अधिकार्‍यांशीही चर्चा होत होती. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात इतरांना मिळतो तसा निवांतपणा मला कधीच मिळाला नाही.

आता उद्योग हळूहळू सुरु होत आहेत. उद्योग सुरू झाल्यावर खरी समस्या येणार आहे ती कच्च्या मालाची. सध्या बर्‍याच उद्योगांमध्ये कच्चा माल चीनकडून येतो. सध्या जगभरातील देशांचे चीनशी संबंध बघिडले आहेत. त्यामुळे कच्च्या  मालाची जुळवाजुळव करणे हे एक आव्हान राहणार आहे. त्याशिवाय कामगारांचाही प्रश्‍न असेलच. बँक आणि सरकार हे दोन्ही घटक अडचणीत आल्यामुळे वित्त पुरवठा ही देखील समस्या राहणार आहे. मात्र उद्योजक त्यातूनही मार्ग  शोधतील असा विश्‍वास कानडे यांनी व्यक्त केला.

या काळात घरात खूपसा वेळ मला देता आला नाही. मात्र पूर्वीपेक्षा थोडा जास्त वेळ मी देऊ शकलो. माझी आई 85 वर्षाची आहे. तिलाही वेळ देता आला. याशिवाय पत्नी आणि दोन मुलांनाही मी पूर्वीच्या तुलनेत थोडा जास्तच वेळ देऊ शकलो याचेच समाधान आहे.

मात्र जो वेळ दिला त्यातून बर्‍याच नव्या गोष्टी मला कळल्याही. गेल्या अनेक वर्षात घरात डाळ तांदूळाचे आणि कणकीचे डबे कुठे असतात याचीही मला कल्पना नसायची. आता त्या जागा किमान माहित झाल्या आहेत. पूर्वी घरचा दूधवाला, भाजीवाला, पेपरवाला हे कोण आहेत हे देखील मला माहित नसायचे. या मिळणार्‍या वेळामुळे या सगळ्यांची ओळख झाली. आणखी एक फायदा म्हणजे मी घरातल्या देवांसाठीही आता वेळ देऊ लागलो आहे. पूर्वीच्या धावपळीत देवांची साग्रसंगीत पूजा करता येत नव्हती. आता मात्र रितसर सोवळे नेसून मी पूजा करायला लागलो आहे.

लॉकडाऊनने संपूर्ण जगातील नागरिकांची जीवनशैली बदलवून टाकली आहे. भविष्यात कोरोनावर प्रतिबंधक औषध केव्हा सापडेल हे आज सांगता येत नाही. एड्स सारखा रोग जगात येऊन 30 वर्ष झालीत मात्र अजूनही एड्स प्रतिबंधक औषधे सापडलेली नाहीत. अशावेळी आपल्याला कोरोनासोबतच आयुष्य जगावे लागणार आहे. आपली जीवनशैली त्यादृष्टीने बदलावी लागेल. कदाचित आपली जुनी भारतीय जीवनशैली त्यादृष्टीने उपयोगाची ठरू शकेल. ज्या गोष्टी आम्ही सोवळे म्हणून नाकारल्या त्या पुन्हा स्वीकारून जीवनशैली कशी जगता येईल ते बघावे लागेल.

अशाही परिस्थितीत आपण पुढे जाऊच ही मला खात्री आहे. आपण भारतीय या परिस्थितीतून मार्ग काढून पुढील वर्षाच्या आत नव्याने समृद्ध असे उद्योगजगत  विकसित करू शकू असा विश्‍वास व्यक्त करीत मिलिंद कानडे यांनी हा संवाद आटोपता घेतला.

-अविनाश पाठक