वर्ध्यात वनरक्षकाला जिवंत जाळण्याचा वाळूमाफियांचा प्रयत्न

May 21,2020

वर्धा, 21 मे - वन जमिनीतून वाळूची अवैध वाहतूक करणार्‍यांवर कारवाईसाठी गेलेल्या वनरक्षक मुनेश्‍वर सज्जन यांच्यावर अतिज्वलनशील पदार्थ टाकून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न वाळूमाफियांनी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही घटना मध्यरात्री वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील कोल्ही-सास्ताबाद पांदण रस्ता मार्गावर घडली. याप्रकरणात वडनेर पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींमध्ये जांगोणा येथील  सरपंचाचा देखील समावेश आहे.

जिल्ह्यात वाळूघाटाचा लिलाव झाला नाही तरीही अवैध वाळू वाहतूक जोरात सुरू आहे. रात्री चालणार्‍या या अवैधधंद्याला आळा घालण्यासाठी वनविभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. हिंगणघाट तालुक्यातील कोल्ही येथे अवैध वाळू तस्करी सुरू आहे. यावर कारवाईसाठी निघालेल्या वनविभागाच्या चमूला वाळू माफियांनी रस्त्यात पकडले. दुचाकीने वाळू माफियांचा शोध घेणार्‍यांमध्ये वनरक्षक मुनेश्‍वर सज्जन व सदाशिव माने यांचा समावेश होता. वनरक्षक  कारवाईसाठी आल्याचे लक्षात येताच आरोपींनी दुचाकीला धडक देत त्यांना जमिनीवर पाडले. आरोपी इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी सोबत असलेला अतिज्वलनशील पदार्थई सज्जन यांच्या अंगावर टाकून त्यांना जिवंत जाळम्याचा  प्रयत्न केला. सज्जन यांनी आरडाओरड केलयावर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. वाळूमाफिया जिल्ह्यात सक्रिय असल्याचे पुन्हा समोर आले आहे. याप्रकरणी वनरक्षक मुनेश्‍वर सज्जन यांनी वडनेर पोलिस ठाण्यात तक्रार   नोंदविली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी वाळू माफिया डबालू कुबडे, सरपंच तथा वाळू माफिया नितीन वाघ याच्यासह त्यांच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.