विद्युत एक्स्पो 2026 : अभियंते, भागधारक ते विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाची ऊर्जा देणारा मंच – संदीप शिरखेडकर

January 11,2026

*विद्युत एक्स्पो २०२६’चा यशस्वी समारोप; १० हजारांहून अधिक नागरिकांची उपस्थिती

नागपूर :  दि इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन, नागपूर तसेच फेडरेशन ऑफ इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (FECAM) यांच्या संयुक्त विद्यमाने वसंतराव देशपांडे सभागृह परिसरात आयोजित तीन दिवसीय ‘विद्युत एक्स्पो २०२६’ हा विदर्भातील अभियंते, भागधारक, इंजिनिअरिंग महाविद्यालयांचे विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी तांत्रिक ज्ञानाची ऊर्जा देणारा ठरल्याचे प्रतिपादन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंगचे अध्यक्ष संदीप शिरखेडकर यांनी केले. ते एक्स्पोच्या समारोपीय कार्यक्रमात बोलत होते.

या प्रसंगी श्री. शिरखेडकर म्हणाले की, एक्स्पोमध्ये आधुनिक विद्युत तंत्रज्ञान, ऊर्जा बचत उपाययोजना आणि स्मार्ट सोल्यूशन्सचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. नागपूरकरांसाठी हा एक्स्पो विशेष आकर्षण ठरला असून आयोजकांनी घेतलेल्या परिश्रमांचे त्यांनी कौतुक केले. पुढील वर्षी होणाऱ्या विद्युत एक्स्पोसाठी शुभेच्छा देताना, पुढील आवृत्तीत २०० पेक्षा अधिक स्टॉल्स असतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर निरीक्षण विभागाचे विद्युत निरीक्षक उमेश धोटे होते. प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती संभाजीनगर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पुसदकर, FECAMचे माजी अध्यक्ष गोविंद देहाडकर, दि इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन, नागपूरचे अध्यक्ष अनिल मनापुरे, सचिव प्रफुल्ल मोहोड, संयोजक देवा ढोरे, सहसंयोजक रमेश कनोजिया, अविनाश खाईवाले आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

यावेळी मान्यवर विजय पुसदकर व उमेश धोटे यांनी ‘विद्युत एक्स्पो २०२६’चे कौतुक करत दि इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन, नागपूरला शुभेच्छा दिल्या. एका छोट्याशा उपक्रमाचे आज मोठ्या वटवृक्षात रूपांतर झाल्याचे त्यांनी नमूद केले. याच वेळी तीन उत्कृष्ट स्टॉलधारकांचा पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

या तीन दिवसीय एक्स्पोला १० हजारांहून अधिक नागरिकांनी भेट दिली, ज्यामध्ये शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, अभियंते, विद्युत कंत्राटदार तसेच सर्वसामान्य नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविण्यात आला. विद्युत क्षेत्रातील बदलती तांत्रिक दिशा आणि भविष्यातील संधी जाणून घेण्यासाठी नागपूरकरांनी एक्स्पोला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

एक्स्पोदरम्यान विद्युत क्षेत्राशी संबंधित ७ वेगवेगळ्या विषयांवर तांत्रिक कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले. ऊर्जा बचत, विद्युत सुरक्षा, स्मार्ट लायटिंग सिस्टिम्स, ई-व्हेईकल चार्जिंग, आधुनिक वायरिंग, ऑटोमेशन तसेच पर्यावरणपूरक तंत्रज्ञान या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळांना विद्यार्थी व व्यावसायिकांकडून विशेष प्रतिसाद मिळाला.

एक्स्पोमधील विविध स्टॉल्सद्वारे विद्युत व इलेक्ट्रिकल क्षेत्रातील नाविन्यपूर्ण, अत्याधुनिक व सुरक्षित उत्पादने, उपकरणे आणि सोल्यूशन्सची सविस्तर माहिती देण्यात आली. औद्योगिक, निवासी तसेच सार्वजनिक पायाभूत सुविधांसाठी उपयुक्त असलेल्या नव्या तंत्रज्ञानामुळे ऊर्जा कार्यक्षमता वाढवणे, खर्चात बचत करणे आणि विद्युत सुरक्षेची पातळी उंचावणे याचे प्रत्यक्ष सादरीकरण या एक्स्पोमध्ये करण्यात आले. नागपूरकरांकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि सर्व स्तरातील लोकांची उपस्थिती यामुळे ‘विद्युत एक्स्पो २०२६’ हे केवळ प्रदर्शन न राहता विद्युत क्षेत्रातील ज्ञानवर्धन, नवोन्मेष आणि उद्योग-व्यवसाय संवादाचे प्रभावी व्यासपीठ ठरल्याचे आयोजकांनी नमूद केले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक देवा ढोरे आभार रमेश कनोजिया यांनी मानले. एक्स्पो यशस्वी करण्यासाठी दि इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन, नागपूरच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.