विद्युत एक्स्पो 2026 : विद्युत क्षेत्रातील नवोन्मेषांचा वेध
January 11,2026
*दुसऱ्या दिवशी अत्याधुनिक तंत्रज्ञान व पर्यावरणपूरक प्रकाश योजनेवर सादरीकरण
नागपूर : विद्युत क्षेत्रातील बदलत्या तांत्रिक गरजांना अनुरूप नव्या संकल्पना, ऊर्जा कार्यक्षम उपाय आणि स्मार्ट सोल्युशन्स यांचे प्रभावी दर्शन ‘विद्युत एक्स्पो २०२६’ च्या दुसऱ्या दिवशी नागपूर येथे घडले. दि इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन, नागपूर (TECA) व फेडरेशन ऑफ इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (FECAM) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या एक्स्पोमध्ये नव्या तंत्रज्ञानामुळे विद्युत क्षेत्र कसे अधिक सुरक्षित, कार्यक्षम व भविष्योन्मुख होत आहे, यावर भर देण्यात आला.
दुसऱ्या दिवशी आयोजित तांत्रिक सत्रांमध्ये ‘इलेक्ट्रिकल सेफ्टी’ या विषयावर गोंदिया येथील इलेक्ट्रिकल कंत्राटदार मिलन वैष्णव यांनी सखोल आणि विविधांगी मार्गदर्शन केले. त्यानंतर ‘लाईटिंग सोल्युशन्स बियॉन्ड बाउंड्रीज (टेक-ट्रेंड्स)’ या विषयावर ओरिएंट इलेक्ट्रिकचे दीपक चौधरी यांनी उत्तम सादरीकरण केले आणि लायटिंग सोल्युशन्स संदर्भातील नवीन संशोधन आणि पर्यावरणपूरक प्रकाशयोजना याविषयी होत असलेल्या कामावर त्यांनी प्रकाश टाकला.
स्मार्ट प्रोटेक्शन सिस्टीम्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित मॉनिटरिंग, फायर-सेफ केबल्स, तसेच रिअल-टाइम फॉल्ट डिटेक्शन तंत्रज्ञानामुळे विद्युत अपघात टाळण्यात कशी मदत होते, याची प्रात्यक्षिकांसह माहिती देण्यात आली.
एक्स्पोमधील विविध स्टॉल्सवर स्मार्ट मीटरिंग सोल्युशन्स, ऊर्जा बचत करणारे ट्रान्सफॉर्मर्स, लो-लॉस केबल्स, सोलर इंटिग्रेशन सिस्टम्स, ईव्ही चार्जिंगसाठी जलद व सुरक्षित चार्जिंग युनिट्स यांना विशेष प्रतिसाद मिळाला. औद्योगिक, निवासी तसेच सार्वजनिक पायाभूत सुविधांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या या नव्या तंत्रज्ञानामुळे खर्चात बचत आणि कार्यक्षमतेत वाढ कशी शक्य आहे, हे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.
विशेष आकर्षण ठरले ते स्मार्ट लाईटिंग सोल्युशन्स. सेन्सर-आधारित ऑटोमॅटिक लाईटिंग, डे-लाईट हार्वेस्टिंग टेक्नॉलॉजी, तसेच IoT-आधारित लाईट कंट्रोल सिस्टीम्समुळे ऊर्जा वापरात लक्षणीय बचत कशी करता येते, याचे सादरीकरण करण्यात आले. स्मार्ट शहरे, औद्योगिक प्रकल्प आणि व्यावसायिक संकुलांसाठी ही तंत्रज्ञाने उपयुक्त ठरणार असल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले.
दुसऱ्या दिवशीही कंत्राटदार, अभियंते, उद्योजक, विद्यार्थी तसेच तांत्रिक तज्ज्ञ तसेच नागरिकांनी देखील मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदवली. नव्या उत्पादनांची प्रत्यक्ष माहिती, तज्ज्ञांशी संवाद आणि भविष्यातील व्यावसायिक संधी यामुळे ‘विद्युत एक्स्पो २०२६’ हे केवळ प्रदर्शन न राहता ज्ञानविनिमयाचे प्रभावी व्यासपीठ ठरत असल्याचे चित्र स्पष्ट झाले.
ऊर्जा कार्यक्षमता, सुरक्षितता आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीने सादर झालेल्या या नवोन्मेषांमुळे विद्युत क्षेत्र अधिक सक्षम, आधुनिक आणि पर्यावरणपूरक होण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे अधोरेखित झाले.






