विद्युत मागणी म्हणजेच प्रगतीचा निर्देशांक : महावितरणच्या संचालकांचे प्रतिपादन

January 10,2026

*‘विद्युत एक्स्पो २०२६’ चे दिमाखदार उद्घाटन* 

नागपूर : विद्युत क्षेत्रातील तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि औद्योगिक क्षमतेचे भव्य दर्शन घडवणाऱ्या ''विद्युत एक्स्पो २०२६"चे उद्घाटन आज नागपूर येथे मोठ्या उत्साहात पार पडले. दि इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन, नागपूर (TECA) यांच्या वतीने आणि फेडरेशन ऑफ इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (FECAM) यांच्या सहकार्याने आयोजित या तीन दिवसीय एक्स्पोचे उद्घाटन महावितरणचे संचालक (प्रकल्प व संचालन) सचिन तालेवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी आपल्या प्रभावी भाषणात सांगितले की, “विद्युत मागणी हाच प्रगतीचा खरा निर्देशांक आहे.” आयोजकांचे कौतुक करत पुढील एक्स्पोमध्ये २०० ते ३०० स्टॉल्स उभारण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असे त्यांनी सुचविले. तसेच संपूर्ण पायाभूत सोयीसुविधा सक्षम करण्यासाठी कंत्राटदारांनी नियम व योजनांबाबत नव्या सूचना, सुधारणा सुचवून सातत्याने संपर्कात राहावे, असे आवाहन केले.

दिनांक ९, १० व ११ जानेवारी २०२६ दरम्यान डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह परिसर, सिव्हिल लाईन्स, नागपूर येथे आयोजित या एक्स्पोमध्ये विद्युत क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान, ऊर्जा बचत उपाय, ईव्ही चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर, ट्रान्सफॉर्मर्स, केबल्स, लाईटिंग सोल्युशन्स आदींचे सादरीकरण करण्यात आले आहे.

उद्घाटन सोहळ्याला कार्यक्रमाचे अध्यक्ष संभाजी शिवाजी माने, मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, नागपूर प्रादेशिक विभाग, प्रमुख पाहुणे डॉ. मनीष वाठ, मुख्य अभियंता (चाचणी व गुणवत्ता), महावितरण, मुंबई, दिलीप दोडके, मुख्य अभियंता, नागपूर परिमंडळ, महावितरण, प्रदीप चामट, अधीक्षक अभियंता (विद्युत निरीक्षण मंडळ), उद्योग-ऊर्जा व कामगार विभाग, नागपूर तसेच हरिष गजभे, मुख्य अभियंता, महावितरण, चंद्रपूर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मंचावर दि इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन, नागपूरचे अध्यक्ष अनिल मानापुरे, सचिव प्रफुल मोहोड, सहसंयोजक रमेश कनोजिया व अविनाश खाईवाले हे मान्यवर उपस्थित होते. विद्युत एक्स्पोच्या तिसऱ्या पर्वाचे प्रास्ताविक अविनाश खाईवाले यांनी केले, तर स्वागतपर भाषण अनिल मानापुरे यांनी केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष संभाजी माने यांनी आपल्या भाषणात सांगितले की, बांधकाम क्षेत्र यासोबतच विद्युत अभियांत्रिकी क्षेत्रातही मोठी आधुनिकता व तांत्रिक बदल घडून आले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत असताना विद्युत विभागाच्या निधी मंजुरीसंदर्भातील एका गमतीशीर प्रसंगाचा उल्लेख करत त्यांनी उपस्थितांमध्ये हास्य लकेर निर्माण केली.

प्रमुख पाहुणे डॉ. मनीष वाठ यांनी विद्युत पुरवठ्याला कोणत्याही उद्योगाचा “कच्चा माल” संबोधत विद्युत विभाग व इलेक्ट्रिकल कंत्राटदार हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे नमूद केले. त्यानंतर दिलीप दोडके, प्रदीप चामट आणि हरिष गजभे यांनी आपापली मनोगते व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मृण्मयी कुलकर्णी यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रफुल मोहोड यांनी केले. या विद्युत एक्स्पोमध्ये ११० पेक्षा अधिक स्टॉल्स असून २००० हून अधिक उत्पादने प्रदर्शित करण्यात आली आहेत. तांत्रिक सत्रे, उद्योग संवाद आणि नव्या संधींमुळे ‘विद्युत एक्स्पो २०२६’ हे विद्युत क्षेत्रातील कंत्राटदार, अभ्यासक, नवउद्योजक आणि विद्यार्थ्यांना दिशादर्शक ठरत आहे. आज इव्ही चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर आणि क्रिएटिव्ह एफिशिएन्सी इन सप्लाय चेन या विषयांवरील तांत्रिक सत्रे झाली. त्याचप्रमाणे पॉली-कॅब प्रॉडक्टसचे सादरीकरण झाले. आज प्रथम दिवशी विद्युत एक्स्पोला लोकांचा भरभरून प्रतिसाद लाभला.