‘हृदयाचे ठोके चुकवू नका’: स्वास्थ्यम तर्फे ‘की-चेन ऑफ सर्व्हायवल’चे अनावरण

September 28,2025

* जागतिक हृदय दिनानिमित्त अभिनव उपक्रम

नागपूर : जागतिक हृदय दिनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरकरांना हृदयविकाराच्या आपत्कालीन प्रसंगी जीव वाचवण्यासाठी एक आगळीवेगळी संकल्पना देण्यात आली. “हृदयाचे ठोके चुकवू नका” ह्या यावर्षीच्या थीमनुसार स्वास्थ्यम सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये झालेल्या कार्यक्रमात ‘की-चेन ऑफ सर्व्हायवल’चे अनावरण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. आपल्या संदेशात त्यांनी हृदयविकारावर उपचार करण्यापेक्षा प्रतिबंधक उपायांना जास्त प्राधान्य दिले पाहिजे असे सांगितले. त्यांनी या ‘की-चेन’च्या अभिनव संकल्पनेचं आणि स्वास्थ्यम टीमच्या प्रयत्नांचं मनापासून कौतुक केलं. या प्रसंगी मंचावर जेष्ठ हृदयरोग तज्ञ व स्वास्थ्यम हॉस्पिटल्सचे संचालक डॉ. पंकज हरकुट, नेत्रतज्ञ डॉ. पूनम हरकुट, नेत्रतज्ज्ञ, हृदयरोगतज्ञ डॉ. योगेश कोळमकर, आपत्कालीन उपचार तज्ञ डॉ. सोहल पराते तसेच रोटरी क्लब नागपूर इशान्यचे अध्यक्ष डॉ. मनीष व डॉ. मनीषा राठी आणि सचिव श्री. विनम्र खेमका उपस्थित होते.


*‘की-चेन ऑफ सर्व्हायवल’ - खिशातली संजीवनी*

ही की-चेन आकाराने छोटी असली तरी तिच्यात मोठं सामर्थ्य आहे. कारण या की चेनच्या आत एका कप्प्यात ॲस्पिरिनची गोळी तसेच वरती हृदयविकार आपत्कालीन मदत क्रमांक (1800 210 3010) दिलेला आहे. हृदयविकाराचा झटका आल्यावर प्रत्येक क्षण महत्वाचा असतो. अशावेळी लगेच ॲस्पिरिन घेणे हृदयावरचा ताण काही प्रमाणात कमी करू शकतं आणि दिलेल्या क्रमांकावर फोन केल्यास वैद्यकीय मदत तातडीने मिळवता येते. त्यामुळे ही की-चेन म्हणजे खिशातली संजीवनी असून कुणालाही सहज वापरता येईल अशी आहे.


*अन्य उपक्रम* 

याच सोबतच स्वास्थ्यम कार्डियाक क्लबची देखील सुरुवात झाली. या मंचावर दर महिन्याला नागरिकांसाठी मोफत सत्रं आयोजित केली जातील, ज्यात आहार, पुनर्वसन, जीवनशैलीतील बदल आणि प्रतिबंधात्मक उपाय याविषयी तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. या क्लबमुळे नागपूरमध्ये हृदय आरोग्याची संस्कृती निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमात मेडीबॉट हे नवे उपकरणही सादर करण्यात आले. औषधं वेळेवर व नियमित घेण्यासाठी उपयुक्त ठरणारे हे उपकरण एका स्टार्ट-अपने डॉ. पंकज आणि डॉ. पूनम हरकुट यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित केले आहे. तसेच “दिल है छोटासा, छोटीसी आशा” या सामाजिक उपक्रमाचीही माहिती उपस्थितांना देण्यात आली. हा उपक्रम स्वास्थ्यम हॉस्पिटल्स आणि रोटरी क्लब नागपूर इशान्य यांनी एकत्रित राबवला असून जन्मजात हृदयविकार असलेल्या मुलांच्या प्रतिबंध व उपचारासाठी कार्य करतो.

आपल्या भाषणात डॉ. पंकज हरकुट यांनी ॲस्पिरिनच्या वेळेवर सेवनाचे महत्त्व, औषधांचे पालन करण्याची गरज आणि हृदयविकारारुद्ध समाजाची तयारी यावर भर दिला. त्यांनी कार्डियाक क्लब आणि मेडिबॉटसारख्या नवकल्पना नागरिकांसाठी दीर्घकालीन आरोग्य टिकवण्यासाठी महत्त्वाच्या ठरतील असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मानसी चोरघडे यांनी केले, तर डॉ. अभिजीत रोकडे आणि संपूर्ण स्वास्थ्यम हॉस्पिटल्सच्या टीमने कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. या अभिनव संकल्पनेमागील संदेश असा की, जीव वाचवण्यासाठी नेहमी मोठे उपाय लागत नाहीत. कधी कधी एखाद्या छोट्याशा गोष्टीतही मोठी ताकद दडलेली असते. की-चेन ऑफ सर्व्हायवल हे त्याचेच जिवंत उदाहरण आहे. *लक्षात ठेवा...आता हृदयरोगाचा प्रथमोपचार आहे तुमच्या खिशात!*