समाधान म्हणजे प्रगतीचा मृत्यू : राजेश रोकडे, रोकडे ज्वेलर्स

March 23,2025

*SCGT नागपूर चॅप्टरच्या बैठकीत प्रेरणादायी मार्गदर्शन

नागपूर : "व्यवसायात समाधानाने थांबू नका, कारण समाधान म्हणजे प्रगतीचा मृत्यू आहे. सातत्याने नव्या संधी शोधा, स्वतःला मोठे लक्ष्य द्या आणि ध्येय गाठण्यासाठी मेहनत करा," असा महत्त्वाचा संदेश रोकडे ज्वेलर्सचे संचालक राजेश रोकडे यांनी व्यावसायिकांना दिला. सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट (SCGT) नागपूर चॅप्टरच्या विशेष बैठकीत ते मार्गदर्शन करत होते.

शनिवारी सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट, नागपूर चॅप्टरची विशेष बैठक चिटणवीस सेंटर, सिव्हिल लाईन्स, नागपूर येथे पार पडली. यावेळी नागपूर चॅप्टरचे चेयरपर्सन बागेश महाजन, सचिव अमित बोरकर आणि कोषाध्यक्ष शरद अरसडे मंचावर उपस्थित होते. 

राजेश रोकडे यांनी आपल्या संघर्षमय प्रवासाविषयी सांगत मराठी व्यावसायिकांनी आत्मविश्वासाने पुढे जाण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. "महाराष्ट्रीयन व्यावसायिकांनी स्वतःला कधीही कमी समजू नये. नोकरी मागणारे न बनता नोकरी देणारे बना. व्यवसाय यशस्वी होण्यासाठी मानसिकता बदलणे गरजेचे आहे. स्वतःला आणि आपल्या टीमला विकसित करण्यासाठी वेळ द्या," असे ते म्हणाले. त्यांनी आव्हानात्मक कामांमध्ये रस घेतल्यास मोठ्या संधी मिळू शकतात असे सांगत, घरातील महिलांना व्यवसायात सहभागी करून त्यांच्यावर जबाबदारी सोपवल्यास व्यवसाय वेगाने वाढतो, असेही स्पष्ट केले.

"व्यवसायात यश मिळवण्यासाठी दर्जा, विश्वास, पारदर्शकता आणि संयम महत्त्वाचे असते. छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. दूरदृष्टी ठेवा, मेहनतीसह धैर्यसुद्धा ठेवा, आणि ग्राहकांच्या गरजा समजून व्यवसाय करा," असे सांगताना त्यांनी व्यवसाय वृद्धीचे महत्त्वाचे १० मंत्रही दिले. "छोटे लक्ष्य ठेवणे हा मोठा गुन्हा आहे, आणि आम्ही तो गुन्हा करत नाही!" असे स्पष्ट करत त्यांनी मोठ्या ध्येयांची गरज अधोरेखित केली.

राजेश रोकडे यांचा परिचय मुग्धा बोबडे यांनी करून दिला, तर आभार श्वेता सहस्रभोजनी यांनी मानले. यावेळी नागपूरमधील अनेक प्रतिष्ठित व्यावसायिक या प्रेरणादायी सत्राला मोठ्या संख्येने उपस्थित होते.