पवारांचा 'तो' निर्णय अन् राष्ट्रवादीचा नेता नाराज; सोडणार घड्याळाची साथ?

June 09,2023

राष्ट्रवादीच्या गोटातून मोठी बातमी समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवार हे पंढरपूरच्या दौऱ्यावर असताना अभिजीत पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. अभिजीत पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर पंढरपुरातून अभिजीत पाटील यांना विधानसभेची उमेदवारी मिळू शकते असे संकेत शरद पवार यांच्याकडून देण्यात आले होते. मात्र शरद पवार यांच्या सूचक वक्तव्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके नाराज असल्याची चर्चा सुरू आहे.

भगीरथ भालके नाराज?

भगीरथ भालके हे पक्षावर नाराज असून, ते बिआरएस पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. मिळत असलेल्या माहितीप्रमाणे या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी भालके यांच्याशी चर्चा केली आहे. राष्ट्रवादीमधील वरिष्ठांकडून  भगीरथ भालके यांना फोन करण्यात आला होता. कोणताही निर्णय घेऊ नका असे वरिष्ठांकडून भालके यांना सांगण्यात आल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान सध्या मतदारसंघात घडत असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीर भालके हे आता आपल्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

शरद पवारांनी काय म्हटलं होतं? 

भारत भालके यांच्या निधनानंतर या तालुक्यात नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झालीये. ती भरून काढण्याचं काम अभिजीत पाटील हे करतील. पुढच्या निवडणुकीला पंढरपूरचा राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर अभिजीत पाटील हे असलं पाहिजे. आज तुम्ही अभिजीत यांचं नेतृत्व तयार केलंय आता त्यांच्या पाठिशी उभं राहणं आमचं काम असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे, त्यामुळे एकप्रकारे शरद पवार यांनी अभिजीत पाटलांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तबच केल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र या चर्चेमुळे भगीरथ भालके हे नाराज असल्याचं समोर येत आहे.