नागपूरच्‍या मैत्री परिवार संस्‍थेला राज्यपालांच्या हस्ते ‘समाजसेवा’ पुरस्‍कार प्रदान

May 22,2023

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबईचे आयोजन 

नागपूर : देशाच्या इतिहासात क्रांतिकारक नेत्यांना बदनाम केले गेले, या इतिहासातील अन्यायाला सुधारून सर्व क्रांतिकारकांना योग्य गौरवित करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार वितरण समारंभात बोलताना केले.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्यावतीने दादर, शिवाजी उद्यान येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या सावरकर सभागृहात नागपूरच्‍या मैत्री परिवार संस्‍थेला राज्‍यपालांच्‍या हस्‍ते ‘स्‍वातंत्र्यवीर सावरकर समाजसेवा’ पुरस्‍कार प्रदान करण्‍यात आला. संस्थेचे सचिव प्रा. प्रमोद पेंडके व सदस्‍य प्राचार्य माधुरी यावलकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. याशिवाय, स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार – २०२३ हा मेजर कौस्तुभ प्रकाश राणे (मरणोत्तर) यांना देण्यात आला. हा पुरस्कार त्यांच्या मातोश्री ज्योति प्रकाशकुमार राणे यांनी स्वीकारला. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर विज्ञान पुरस्कार २०२३ हा  आय. आय. टी. कानपूरचे संचालक प्रा. अभय करंदीकर यांना तर प्रदान करण्यात आला. तर स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृतीचिन्ह पुरस्कार – २०२३ हा  रत्नागिरी येथील अधिवक्ता (वकील) प्रदीप (बाबा) चंद्रकांत परुळेकर यांना प्रदान करण्यात आला.

राज्‍यपाल म्‍हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर हे समाजाचे शिल्पकार होते, समाजातील दोष दूर करणारे सुधारक होते, जातिभेदाविरोधात लढणारे योद्धे होते. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात येणे हे तीर्थयात्रेसारखे आहे. २८ मे हा दिवस महाराष्ट्र शासनाने स्वातंत्र्यवीर सावरकर गौरवदिन म्हणून घोषित केला असून त्याच दिवशी दिल्लीत नव्या संसद भवनाच्या वास्तुचे उद््घाटन होणार आहे, अशी माहिती राज्यपालांनी यावेळी दिली. 

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक  प्रवीण दीक्षित, कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर सह कार्यवाह स्वप्निल सावरकर याची यावेळी उपस्थिती होती. समारंभाचे  सूत्रसंचालन श्रीराम केळकर यांनी केले. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी प्रास्ताविक केले. तर स्मारकाचे अध्यक्ष  आणि राज्याचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित  आभारप्रदर्शन केले.