जी-20 प्रतिनिधींचे नागपूर येथे मोठ्या उत्साहात स्वागत

March 19,2023

*पारंपारिक पद्धतीच्या आदरातिथ्याने मान्यवर भारावले

नागपूर : जी-२० परिषदेअंतर्गत येथे उद्यापासून आयोजित होणाऱ्या सी-२० परिषदेसाठी देश-विदेशातून आलेल्या प्रतिनिधींचे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. सी-२० च्या अध्यक्षा माता अमृतानंदमयी यांच्यासह सदस्य देशांमधील नागरी संस्थांचे प्रतिनिधी या आगळ्यावेगळ्या स्वागताने भारावले होते.

विमानतळाच्या लाऊंजमध्ये या प्रतिनिधींनी प्रवेश करताच नऊवारी परिधान केलेल्या मुली आणि धोतर ,कुर्ता व फेटा परिधान केलेल्या मुलांनी  औक्षण करुन तसेच फेटा व सुताची माळ  घालून पाहुण्यांचे स्वागत केले. सी-२० च्या अध्यक्ष माता अमृतानंदमयी, जी-२० देशांच्या नागरी संस्थांच्या प्रतिनिधींचा यात समावेश आहे. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी  सौम्या शर्मा यांनी प्रतिनिधींचे स्वागत केले.

स्वागतासाठी विमानतळाचा सारा परिसर सजला होता.  केळीचे खांब, मोठे पितळी कळस आणि जोडीला कलावंतांनी आळवलेले बासरी, तबला आणि संवादिनीचे सूर, ठिकाणी - ठिकाणी उभारण्यात आलेले स्वागत फलक  जी-२० व सी-२० चे आकर्षक बोधचिन्ह, सुमधुर संगीत आदींमुळे  विमानतळावरील वातावरण उत्साहाने भारून गेल्याचे चित्र दिसून आले. लाऊंजमधून बाहेर पडतात ढोलताशांच्या निनादाने उत्साही वातावरणात अधिकच भर पडली. नागपूरचे वैशिष्ट्य असलेल्या संत्र्यासह संत्रा बर्फीचा आस्वादही पाहुण्यांनी यावेळी घेतला. 

विमानतळाच्या परिसरात जी-२० देशांचे ध्वज डौलाने फडकत आहेत आणि हे प्रतिनिधी आपल्या देशाचा ध्वज बघून त्याला भारतीय पद्धतीने प्रणाम  करत होते.

शहरात उद्यापासून २१ मार्चपर्यंतदरम्यान सी-२० परिषद आयोजित होत आहे. २० मार्च रोजी दुपारी साडेतीनला येथील रॅडिसन ब्लु हॉटेलमध्ये सामाजिक तथा अध्यात्मिक नेत्या माता अमृतानंदमयी यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सी-२० परिषदेचे उद्घाटन होणार आहे.

सी-२०  साठी तयार करण्यात आलेल्या विविध १४  विषयांवर या परिषदेत विचारमंथन होणार आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत २१ मार्च रोजी या परिषदेचा समारोप होणार आहे.