सी-20 परिषदेसाठी नागपुरमध्ये उत्साह

March 16,2023

*शहरात ठिकठिकाणी रोषणाई

नागपूर : सी -20 परिषदेच्या आयोजनाची तारिख जवळ येत आहे तसे शहरात उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. विमानतळ ते रहाटेकॉलनी चौक आणि सिव्हिल लाईन्स परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. तर  कस्तुरचंद पार्क, झिरो माईल्स आदी शहरातील महत्वाची स्थळे रोषणाईने न्हाऊन निघाल्याचे चित्र आहे.


येत्या 20 ते 22 मार्च दरम्यान शहरात सी-20 परिषदेचे आयोजन होत आहे. यासाठी शहरात ठिकठिकाणी सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. रस्त्याच्या दुतर्फा आकर्षक फुलझाडे लावण्यात आली आहेत. विविध ठिकाणच्या संरक्षक भिंतींवर सी-20 चे बोधचिन्ह, विविध विषयांवरील आकर्षक चित्रे चितारण्यात आली आहेत. या जोडीलाच आता विमानतळ ते रहाटेकॉलनी चौकापर्यंत आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. रस्त्याच्या दुभाजकांवर ग्लोसाईन बोर्ड, मेट्रो पीलर दरम्यानच्या छताखाली एलईडी दिव्यांची फुल-पाखरे, रस्त्याच्या दुतर्फा डेकोरेटिव्ह पोल लाईट्समुळे झगमगाट दिसून येत आहे. रस्त्यावरुन जाताना सी-20 आयोजन व परदेशी पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी शहर सज्ज झाल्याची ग्वाही देतानाच नागरिकांमध्ये उत्साह निर्माण होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.


सिव्हिल लाईन्स परिसरात रस्त्याच्याकडेला झाडांवर आकर्षक लाईटिंग, जीपीओ चौकात उभारण्यात आलेले गोलाकारातील रोषणाई,  स्टँड्स व त्यावरील रोषणाई, जीपीओ चौक ते भोले पेट्रोल पंप परिसरात झाडांवर जवळपास दोन फुट आकारांचे कंदिल, एलईडी फुल-पाखरे लावण्यात आले आहे. या सर्व आकर्षक रोषणाईमुळे या परिसरास दिवाळी सदृष्य वातावरण निर्माण झाले आहे.