आता पोस्ट ऑफिसमधून काढता येईल पासपोर्ट

July 26,2021

नवी दिल्ली : २६ जुलै - पासपोर्ट काढण्यासाठी अनेकांना पासपोर्ट कार्यालयात चकरा माराव्या लागतात. मात्र यापुढे पासपोर्ट काढण्यासाठी  पासपोर्ट कार्यालयात हजार चकरा मारण्याचा त्रास कमी होणार आहे. इंडिया पोस्टकडूनच एका ट्विटद्वारे याबद्दलची  माहिती देण्यात आली आहे. पासपोर्ट मिळविण्यासाठी तुम्हाला जन्माचा दाखला, दहावी-बारावीचं मार्कशीट, मतदान ओळखपत्र, पॅनकार्ड, आधार  कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, रेशनकार्ड आणि नोटरीद्वारे केलेले प्रतिज्ञापत्र ही कागदपत्रे लागतील. हे घेऊन तुम्हाला  तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये पोहोचावे लागेल. आपली सर्व कागदपत्रे पोस्ट ऑफिसमध्ये नेल्यानंतर त्याची  सत्यता तपासली जाईल. कागदपत्रे योग्य आढळल्यास प्रक्रिया पुढे जाईल. या भेटीदरम्यान अर्जदाराचे फिंगर प्रिंट आणि डोळ्यातील पडदा स्कॅन केला जाईल. कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर संपूर्ण प्रक्रियेस १५ दिवस लागतील.

यानंतर तुम्हाला पासपोर्ट मिळेल. पासपोर्टसाठी अर्ज करण्यासाठी आपण नोंदणी करून ऑनलाईन अर्ज करू शकता.  यासाठी आपल्याला पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करावी लागेल. यानंतर तुम्हाला पासपोर्ट तयार  करण्यासाठीचे ऑनलाईन शुल्क आणि फॉर्म जमा करावा लागतो. असे केल्यावर तुम्हाला एक तारीख सांगितली  जाईल. त्या दिवशी आपल्याला निवडलेल्या कागदपत्रांसह जवळच्या टपाल कार्यालयात जावे लागेल.