शाळांनी शैक्षणिक शुल्कात २५ टक्के सवलत द्यावी – नितीन गडकरी

July 26,2021

नागपूर : : २६ जुलै - काही दिवसांपासून विनाअनुदानित शाळांकडून मोठय़ा प्रमाणात शुल्क आकारले जात असून कोरोना काळात  या शाळांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात २५ टक्के सवलत द्यावी. उर्वरित ७५ टक्के शुल्क हे टप्प्याटप्प्याने घ्यावे, अशी विनंती जिल्हाधिकारी व शिक्षण उपसंचालकांनी विनाअनुदानित शाळांना करावी, अशी सूचना केंद्रीय मंत्री नितीन  गडकरी यांनी केली. या खासगी शाळांच्या वाढीव शुल्का विरोधात विद्यार्थी आणि पालकांचे एक शिष्टमंडळ गडकरी यांना भेटले . त्यावेळी पालकांनी ५० टक्के शुल्कमाफीची मागणी केली होती. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी गडकरी  यांच्या निवासस्थानी रविवारी बैठक झाली. कोरोना काळात शाळा बंदच होत्या. त्यामुळे शैक्षणिक शुल्कात सवलत हवी, अशी भूमिका पालकांची आहे. तर शाळा बंद असल्या तरी शिक्षकांचे पगार व शाळांचा अन्य खर्च सुरू होता, याकडे  शाळा संचालकांनी लक्ष वेधले. कोरोना संकटामुळे सर्वसामान्य पालकांची एकरकमी शैक्षणिक शुल्क भरण्याची ऐपत नाही. अशावेळी शाळांचे व्यवस्थापन पालकांशी उर्मटपणे वागते अशा स्वरूपाच्या तक्रारी पालकांनी केल्या.

यावेळी गडकरी म्हणाले, महामारीमुळे सर्वच क्षेत्र कोणत्या ना कोणत्या समस्येचा सामना करीत आहे. बसचालकांची  स्थितीही चांगली नाही. त्यांनी बसेस कर्जावर घेतल्या. पण कर्जाचे हप्ते भरू शकत नाही. अशा स्थितीत यावर मार्ग  काढणे आवश्यक आहे. याप्रसंगी ७५ टक्के शुल्क हे शाळांनी टप्प्याटप्प्याने स्वीकारावे, अशी सूचना पालकांकडून आली.