रुग्णवाहिकाच उपलब्ध नसल्याने कोरोनाबाधित महिलेवर पहाटे तीन वाजता अंत्यसंस्कार

April 08,2021

वर्धा: ८ एप्रिल -  वर्धा जिल्ह्यात कोरोनाच्या महामारीने चांगलेच डोके वर काढले आहे. आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात एका महिलेचा मृत्यू झाला. त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक यांनी दिले. पण आर्वीत रुग्णवाहिकाच उपलब्ध नसल्याने रुग्णवाहिका अमरावती येथून येईपर्यंत वाट बघावी लागली. त्यामुळे मृतदेहावर पहाटे तीन वाजता अंत्यसंस्कार करावे लागले.

आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात एका मध्यमवर्गीय कुटुंबातील महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मृत माहिलेवर शासकीय नियमाप्रमाणे अंत्यसंस्कार करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक आणि नगर पालिकेचे मुख्याधिकारी देवळीकर यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले. त्यामुळे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी कर्मचाऱ्यांची  धावपळ सुरू झाली. मृतदेहाचे संपूर्ण शरीर बांधण्यात आले. पीपीई किट घालून अंत्यविधी पार पाडणाऱ्याना बोलाविण्यात आले.

मात्र,मृतदेहाला स्मशानभूमीपर्यंत नेण्यासाठी शासकीय रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. त्यामुळे रुग्णवाहिकेसाठी धावपळ सुरू झाली. अशातच सामाजिक कार्यकर्त्याला दूरध्वनी करून रुग्णवाहिका बोलविण्यात आली. पण अमरावती येथून रुग्णवाहिका येईपर्यंत पहाटेचे तीन वाजले. तोपर्यंत नगर पालिकेचे कर्मचारी ताटकळत बसले होते. अमरावती येथून रुग्णवाहिका आल्यानंतर महिलेच्या मृतदेहाला स्मशानभूमीत आणण्यात आले. त्यानंतर कोविडच्या नियमानुसार. अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपमुख्याधिकारी रणजित पवार, बांधकाम अभियंता साकेत राऊत, सौरभ निखारे, शंतनू भंडारकर, अभियंता सुनील अरीकर, शिवा चिमोटे, करण चावरे, विक्की टाक, धीरज हडाले यांनी मोलाची कामगिरी बजावली.

जिल्ह्यात कोरोणाचा प्रादुर्भाव वाढतोय. त्यामुळे इतर ठिकाणच्या रुग्णाला हलवायचे असल्यास रुग्णवाहिका आवश्यक असते. अशावेळी रुग्णवाहिका चालक कोरोना रुग्णाला घेऊन जाण्यास नकार देतात. तर काही जादा पैसे घेऊन सेवा देतात. कोरोनाचा काळ सुरू आहे. त्यामुळं रुग्णवाहिकेचा तुटवडा शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयाला सुद्धा बसत आहे.