शासकीय बाबूगिरीचा प्रताप सैनिकाच्या विधवेला ६९ वर्षांनी मिळाली पेन्शन

April 08,2021

नवी दिल्ली : ८ एप्रिल- सरकारी व्यवस्थेच्या दिरंगाईचा नवा रेकॉर्ड एका सैनिकाच्या विधवा पत्नीच्या वाट्याला आला. पतीच्या मृत्यूनंतर तब्बल 69 वर्षांनी त्याच्या नावाचे पेन्शन या महिलेला मिळाले आहे. अवघ्या 12 व्या वर्षी परुली देवी यांचे पती सैनिक गगन सिंह शहीद झाले होते. परुली देवींचे पती गगन सिंह भारतीय सैन्यदलात कार्यरत होते. 1952 साली कर्तव्य बजावत असताना गगन सिंह शहीद झाले होते. मात्र परुली देवी यांना पतीनंतर मिळणारे पेन्शन मिळायला 2021 सालाची वाट पाहावी लागली.

परुली देवी यांचा विवाह लोहाकोट येथील सैनिक गगन सिंह यांच्याशी 10 मार्च 1951 या दिवशी झाला होता.  दुर्दैवाने लग्न झाल्यानंतर दुसऱ्याच वर्षी 14 मे 1952 रोजी गगनसिंह यांचा कर्तव्य बजावत असताना गोळी लागून मृत्यू झाला. पतीच्या निधनानंतर परुली देवी यांनी काही काळ सासरीच घालवला. त्यानंतर त्या त्यांच्या माहेरी परतल्या. यानंतर पुन्हा त्या सासरी परतल्या नाहीत.

परुली देवी यांच्या आई-वडील आणि नातेवाईकांनी त्यांचे पालनपोषण केले. या सगळ्या काळात पतीच्या निधनानंतरच्या पेन्शनबाबत ना त्यांना काही माहिती मिळाली, ना भारतीय सैन्यदलाने याची दखल घेतली. अखेरीस अनेकांना पेन्शन मिळवून देण्यासाठी मदत करणारे निवृत्त अधिकारी डी एस भंडारी यांनी पुढाकार घेऊन केलेल्या प्रयत्नांना यश आले आणि सुमारे साठ वर्षांनंतर पेन्शनचे दार परुलीदेवी यांच्यासाठी खुले झाले.

प्रयागराजहून आता परुली देवीयांना कौटुंबिक पेन्शन देण्यास संमती देण्यात आली आहे. निवृत्त अधिकारी आणि हा लढादेणारे डी एस भंडारी यांनी सांगितले की परुली देवी यांना 1977 पासून 44 वर्षांच्या पेन्शनचा एरियस सुमारे 20 लाख रुपयांपर्यंत मिळेल. आपल्या माहेरच्यांनी आपला इतके वर्ष सांभाळ केला. आपल्याला काहीही कमी पडू दिले नाही, त्यामुळे या पैशांवर खरा हक्क त्यांचाच असल्याचं परुली देवी यांचं म्हणणं आहे.

परुली देवी यांच्या भावाचा मुलगा प्रवीण लुंठी यांना आत्याला 69 वर्षांनी पेन्शन मिळणार असल्याचे ऐकून आनंद झाला आहे. मात्र भारतीय सैन्यदलाने इतके वर्ष केलेल्या दिरंगाईवर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.