दारूची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला, दारूसह ४४ लाखाचा मुद्देमाल जप्त

April 07,2021

गडचिरोली : ७ एप्रिल - गडचिरोली जिल्ह्यात अवैधरित्या दारूची वाहतूक होत असल्याच्या मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज गडचिरोली-आरमोरी मार्गावरील कठानी नदीवर सापळा रचून  दारूसह ४४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी विजय काशिनाथ वनकर (४८) रा. अडपल्ली (गोगाव) यास अटक करण्यात आली. तर ३ आरोपी फरार झाले.

दुसऱ्या  जिल्ह्यातून अवैधरित्या दारूची गडचिरोलीत वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला प्राप्त झाली. यावरून पोलिसांनी आज सकाळी ९ वाजताच्या दरम्यान गडचिरोली- आरमोरी मार्गावरील कठानी नदीवर सापळा रचाला असता एमएच ३४ एबी ६२५९ क्रमांचा ट्रक संशयास्पद आढळून आल्याने ट्रकला थांबवून चौकशी केली असता त्यामध्ये २४ लाख रूपये किंतीची सुपर रॉकेट संत्रा कंपनीचे ३00 बॉक्स आढळून आले. पोलिसांनी दारू व वाहतूकीकरिता वापरण्यात आलेला २0 लाख रूपये किंमतीचा ट्रक असा एकूण ४४ लाख १ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी विजय वनकर यास अटक करण्यात आली तर अन्य तीन आरोपी फरार झाले. 

सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी, सहायक पोलिस निरीक्षक विक्रांत सगणे, पोलिस अंमलदार बोकर, लोहंबरे, गवई, पुट्टावार, राऊत, दुधबळे, निसार यांनी केली.