अंकिता जळीत प्रकरणातील सर्व साक्षी पूर्ण

April 07,2021

वर्धा : ७ एप्रिल - अंकिता जळीत प्रकरणात  मंगळवार ६ रोजी ५ जणांची साक्ष झाली असुन आतापर्यंत या प्रकरणात २६ जणांच्या साक्षी पुर्ण झाल्या आहेत. अंकिता पिसुड्डे जळीतकांड प्रकरणात तपास करण्यार्या अधिकारी असलेल्या पाच जणांची साक्ष काल पूर्ण झाली.

 आजच्या साक्षीत पोलिस हवालदार मनोज लोहकरे, नप अभियंता माळवे, मेगारेलचे कर्मचारी दीपकसिंग ठाकुर, बुटीबोरीचे पोलिस निरिक्षक विनोद ठाकरे व वोडाफोनचे नोडल अधिकारी दत्ता आगरे यांची सरतपासणी तसेच उलट तपासणी पुर्ण झाली. हिंगणघाटचे तात्कालिन पोलिस निरीक्षक सत्यवीर बंडिवार यांची सर तपासणी आज पुर्ण झाली पण उलट तपासणी अपुर्ण राहिली. बंडिवार यांच्या उलट तपासणी सोबतच ज्यांच्या मार्गदर्शनात या प्रकरणाचा तपास पुर्ण करण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी तृप्ती जाधव तसेच जिओ फोनचे नोडल अधिकारी यांची साक्ष पुढील तारखेला होणार असुन या प्रकरणातील पुढील तारीख 8 एप्रिल असल्याची माहिती प्रसिद्ध विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली.  अंकिता पिसुड्डे जळीतकांड प्रकरणाचे कामकाज आज सकाळी 11 वाजता जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. एन. माजगावकर यांच्या समोर प्रकरणाच्या सुनावणीला सुरवात झाली. दुपारी अर्ध्या तासाच्या विश्रांती नंतर सायंकाळी 4 वाजेपर्यंत या प्रकरणाचे सलग कामकाज चालले. आरोपी विकेश नगराळे हा मेगारेलमध्ये कार्यरत होता. तेथील त्याचा पर्यवेक्षक दीपकसिंग ठाकुर याची आज साक्ष झाली. त्याने आपल्या साक्षीतुन घटनेच्या दिवशी विकेशची साप्ताहीक सुट्टी असल्याने तो कामावर गैरहजर असल्याचे सांगीतले. घटनेच्या पुर्वीच्या दोन दिवसात तो कामावर हजर असल्याचे सांगतानाच घटना घडल्यानंतर दुसर्याच दिवशी त्याला बडतर्फ करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केल्याचे सांगण्यात येते. बुटीबोरीचे पोलिस निरिक्षक विनोद ठाकरे यांनी आरोपी विकेशला टाकळघाट येथुन ताब्यात घेतले. तो घटनाक्रम त्यांनी आपल्या साक्षीमध्ये विषद केला. वोडाफोनचे नोडल अधिकारी दत्ता आगरे यांची साक्ष ते पुणे येथे असल्याने दृकश्राव्य माध्यमातुन झाली. आज सरकारी पक्षातर्फे प्रसिद्ध विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी भाग घेतला त्यांना सरकारी वकील अॅड. दीपक वैद्य यांनी सहकार्य केले तर बचाव पक्षातर्फे भूपेंद्र सोने यांनी बाजू मांडली.