गोठ्याला आग लागून शेतकऱ्याचे ७० हजारांचे नुकसान

April 07,2021

भंडारा : ७ एप्रिल - गोठ्याला आग लागून वर्षभराच्या जनावरांचा चारा जळून खाक झाल्याची घटना करडी जवळील किसनपूर येथे काल  रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. यात जवाहरलाल चुन्नीलाल ठाकरे यांचे जवळपास ७० हजारांचे नुकसान झाले. ठाकरे यांनी त्यांच्या घरालगत असलेल्या गोठ्यामध्ये जनावरांचे चाऱ्याकरिता  तणीस साठवून ठेवली होती. काल  रात्रीच्या सुमारास अचानक या तणसीच्या ढीगाऱ्यात आग लागली. काही कळण्याच्या आतच आगीने रौद्र रुप धारण केल्याने तिच्यावर नियंत्रण मिळविणे कठिण झाले. आगीची माहिती करडी पोलिस स्टेशनला देण्यात आली. पोलिसांनी तुमसर नगर परिषदेच्या अग्निशमन यंत्रणेला आगीची सूचना दिली. अग्निशमक दलाने घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळविले. तोपर्यंत जवाहरलाल ठाकरे यांचे जवळपास ७० हजारांचे नुकसान झाले होते. जांभोरा येथील तलाठी तसेच पोलिस पाटील विजय अंबाडारे, उपसरपंच यादोराव मुंगमोडे, राधेश्याम उईके, कोतवाल अनिल वैद्य तसेच ग्रामपंचायत कर्मचाèयांच्या उपस्थितीत घटनेचा पंचनामा करण्यात आला. सदर आग विद्युत शार्ट सर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. नुकसानग्रस्त ठाकरे यांना शासनातर्फे आर्थिक मदत देण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.